वास्को: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूलमंत्री जुझे फीलीप डी’सोझा यांच्यासहीत त्यांच्या पत्नी नेनी डी’सोझा व तीन मुलांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याने शुक्रवारी (दि.१७) त्यांना ‘मडगाव रेसिडेंन्सी’ मध्ये दाखल करण्यात आले आहे. जुझे फीलीप डी’सोझा व त्यांच्या कुटूंबातील काही सदस्यांना मागच्या दिवसात ताप यायला लागल्याने त्यांनी कोरोनाबाबत चाचणी केली असता त्यांचा अहवाल ‘पोझेटीव्ह’आला आहे.
गोव्याचे माजी महसूलमंत्री जुझे फीलीप डी’सोझा यांना तसेच त्यांच्या पत्नी नेनी डी’सोझा त्यांच्या दोन मुली व एका मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीच्या अहवालात स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी त्यांना उपचारासाठी नेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांना संपर्क केला असता जुझे फीलीप डी’सोझा यांच्यासहीत त्यांच्या घरातील एकूण पाच सदस्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल ‘पोझेटीव्ह’ आलेला असल्याची माहीती त्यांनी दिली. जुझे फीलीप डी’सोझा व त्यांच्या परिवारातील काही सदस्यांना मागच्या दिवसात ताप येण्यास सुरवात झाल्याने त्यांची कोरोनाबाबत चाचणी करण्यासाठी नमूने घेण्यात आले होते. यानंतर त्यांचा कोरोना विषाणूबाबत अहवाल ‘पोझेटीव्ह’ आल्याने शुक्रवारी त्यांना मडगाव येथे दाखल करण्यात आल्याची माहीती डॉ. बोरकर यांनी दिली. काही दिवसापूर्वी जुझे फीलीप डी’सोझा यांचे मोठे भाऊ तथा मुरगाव नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक पाश्कॉल डी’सोझा (वय ७२) यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मडगाव येथील कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. ५ जुलै रोजी पाश्कॉल डी’सोझा यांचा इस्पितळात कोरोनावर उपचार घेत असताना मृत्यू झाला. पाश्कॉल यांच्या कुटूंबातील अन्य काही सदस्यांनाही कोरोना विषाणूची बाधा झाल्याने त्यांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वास्कोचे माजी आमदार जुझे फीलीप डी’सोझा यांना तसेच त्यांच्या घरातील इतर चार सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहीती शुक्रवारी वास्को शहरात पसरताच अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली. जुझे फीलीप डी’सोझा यांच्या पत्नी नेनी डी’सोझा या मुरगाव नगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. डी’सोझा व त्यांचे कुटूंब लवकरात लवकर ठीक होऊन घरी परतावे अशीच आमची प्रार्थना असल्याचे अनेकांनी त्यांच्याशी बोलताना सांगितले. वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी जुझे फीलीप डी’सोझा व त्यांच्या परिवारातील इतर सदस्य लवकरच ठीक होऊन घरी परतावे अशी देवाशी प्रार्थना असल्याचे सांगितले.