पणजी : राज्यात खास मुलांची काळजी घेणाऱ्या, त्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. मात्र, या संस्थांना आवश्यक तेवढ्या सोयीसुविधा आणि प्रशस्त जागा उपलब्ध नसल्यामुळे खास मुलांच्या विकासात हातभार लावणे शक्य होत नाही. खास मुलांच्या पालकांचे निधन झाल्यानंतर ते आर्थिक स्वावलंबी बनावे यासाठी उपाययोजना करण्याची गरज असून रोटरी क्लब आॅफ पणजी यांनी आयोजित केलेल्या उपक्रमांचे लोकांकडून कौतुक होत आहे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष विदेश नाडकर्णी यांनी सांगितले. राज्यातील विविध प्राथमिक पातळीवर शिक्षण घेणाऱ्या खास मुलांना सुसज्य सोयीसुविधांनी योग्य आणि मुलांना पूरक असे वातावरण असलेली शाळा उभारण्याचा संकल्प क्लबने केला आहे. ‘हॅपी स्कूल’ या उपक्रमांतर्गत खास मुलांसाठी विशेषता मुलींना सोयीसुविधाअभावी शाळा सोडावी लागू नये म्हणून सुविधा पुरविण्याकडे लक्ष देण्यात येईल. यात खास मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या विविध संस्थांना, शाळांना सहभागी करून घेतले जाणार. या उपक्रमांस आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून दि. ११ आॅक्टोबर रोजी रक्षामंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत ७0 टक्के प्रवेश नोंदणी झाली आहे. कार्यक्रम डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यात ज्येष्ठ पत्रकार गौरव सावंत उपस्थित असतील. कार्यक्रमात चर्चेसमवेत मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांच्या संगीताचा कार्यक्रम होईल. तर सुमित आनंद यांच्या विनोदाचा कार्यक्रम होणार आहे. विदेश नाडकर्णी म्हणाले, क्लबने २0१४-१५ साली एक सर्वेक्षण करून खास मुलांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो याची माहिती गोळा केली होती. यात प्रामुख्याने पालकांचे छत्र हरवलेल्या खास मुलांना जगणे त्रासदायक होते याची जाणीव झाली. त्यामुळे क्लबने अशा मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी राज्यात दोन व्यावसायिक केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे. एक केंद्र दक्षिण गोव्यातील खास मुलांसाठी उभारण्यात येणार आहे. तर दुसरे उत्तर गोव्यातील खास मुलांसाठी असणार आहे. खास मुलांना त्यांचे कौशल्य हेरून त्या प्रकारचे काम करण्याची संधी या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात दिले जाईल. यासाठी खास प्रशिक्षक आणि मार्केटिंगबाबतची काळजीही घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विशेष मुलांच्या स्वावलंबनासाठी योजनांची गरज
By admin | Published: September 27, 2015 2:55 AM