म्हापसा - पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी खास करुन किनारी भागात होत असलेल्या उपद्रवावर संताप व्यक्त करुन मागील विधानसभा अधिवेशात पर्यटन व्यापार कायद्यात दुरुस्ती करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपणाला दिले होते. पण त्यांच्या आजारपणामुळे सदरची दुरुस्ती अद्यापपर्यंत पडून असल्याचे मत उपसभापती मायकल लोबो यांनी व्यक्त केले आहे.
म्हापसा शहराजवळ असलेल्या वेर्ला-काणका पंचायत क्षेत्रात एका कार्यक्रमावेळी लोबो यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना ही माहिती दिली. मुख्यमंत्री ठिक असताना आपण त्यांच्याशी हा कायदा दुरुस्त करण्यासंबंधी विस्तारीतपणे चर्चा केली होती. केलेल्या चर्चे अंती त्यात दुरुस्ती करण्यास त्यांनी सहमती सुद्धा दर्शवली होती. तसेच मागील अधिवेशात हा कायदा दुरुस्तीसाठी विधानसभेच्या अधिवेशनात मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मान्यता सुद्धा दिली होती; पण नंतर ते आजारी झाल्याने व आजारपणावर उपचार करण्यासाठी त्यांना अमेरिकेत जावे लागल्याने दुरुस्तीचा प्रस्ताव पडून राहिल्याचे लोबो यावेळी म्हणाले. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या पर्यटकांवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्याची तरतुद होती.
पर्यटक सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करताना दारुच्या बाटल्या तोडून टाकतात. खास करुन किनाऱ्यावर उपद्रव करतात. उघड्यावर जेवण बनवतात. जेणे करुन त्यांचा त्रास इतरांना सहन करावा लागतो. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी किंवा इतर सुट्ट्यांच्यावेळी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात. येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने बाटल्या फोडण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे इतरांना किनाऱ्याचा आनंद लुटणे त्रासदायी ठरत असते.
राज्यातील ६० टक्के अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे या व्यवसायात सुधारणा घडवून आणण्याची तसेच व्यवसायात शिस्त व सुसूत्रता आणण्याची गरज लोबो यांनी बोलताना व्यक्त केली. तसेच राज्यातील रस्त्यांच्या दर्जांत सुधारणे बरोबर, पार्किंग सुविधेत तसेच इतर कामांत सुधारणा घडवून आणून जास्तीत जास्त पर्यटकांना गोव्यात आणण्यासाठी आकर्षित करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मायकल लोबो यावेळी म्हणाले.