पणजी - कथित सिंचन घोटाळा किंवा अन्य विषय भाजपा सरकारकडून निवडणुकीवेळी उपस्थित केले जातील याची कल्पना शरद पवार यांना निश्चितच होती किंवा असेल. अशा प्रकारचे विषय नेमके निवडणुकीवेळी उपस्थित करणे हे भाजपाचे तंत्रच आहे. त्याला उत्तर देण्यासाठी पवारही तयार असतीलच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काँग्रेसने युती करण्याविषयी त्याचा काही परिणाम होत नाही. महाराष्ट्रात आमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती असणे ही काळाची गरज आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी लोकमतला सांगितले.
शिंदे हे एका सोहळ्यानिमित्त गोव्यात आलेले आहेत. पणजीत लोकमतच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली व राजकीय विषयांबाबत काही प्रश्न विचारले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सॅक्युलर असून त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रातील गावांमध्ये आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असणे हे त्यामुळे गरजेचे ठरते, असे शिंदे म्हणाले. राफेल घोटाळा बोफोर्सप्रमाणे कशाला गाजू शकला नाही असे विचारताच शिंदे म्हणाले, की राफेल हा फार मोठा घोटाळा आहे हे लोकांना कळून आले आहे. मात्र समाजाच्या तळागाळापर्यंत हा विषय पोहचविण्याबाबत आम्ही कमी पडलो असाही त्याचा अर्थ होतो. यापुढे तो विषय सर्वत्र पोहचेल. भाजपाच्या काही नेत्यांना अलिकडे वारंवार फ्रान्सला जावे लागत आहे. त्यामागील कारणोही कालांतराने उघड होतील.
गोव्यातील राजकारणाविषयी बोलताना शिंदे म्हणाले, की गोव्यात जर सगळे संघटीत राहिले तर निश्चितच येथे सत्ताबदल होईल. प्रत्येकाने मुख्यमंत्री होण्याची इच्छा धरू नये असे त्यांनी गोव्यातील काही छोट्या पक्षांच्या संदर्भात नमूद केले. 2007 साली दिगंबर कामत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री बनावे अशी शिफारस मी केली होती. कारण कामत यांचे वीजमंत्री म्हणून मी काम पाहिले होते. बाकी त्यांचे नाव सूचविण्यामागे माझा अन्य काही हेतू नव्हता. गोव्यात सध्या प्रशासन नावाची गोष्टच अस्तित्वात नाही व हे सगळे कसे काय एवढे महिने चाललेय तेच कळत नाही. सरकारमधील घटक पक्ष भाजपासोबत जाऊन फसलेत.