लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा कधीच नव्हती. मी पक्षाकडे मुख्यमंत्री पद कधी मागितलेही नाही. पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडणे, हेच आपल्यासारख्या कार्यकर्त्याचे काम आहे, असे भाजपचे उत्तर गोवा मतदारसंघातील उमेदवार श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्हीच मुख्यमंत्री होणे रास्त नव्हते का, असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता त्यांनी सांगितले की, पक्षाकडे मागणे हेच मुळात भाजपचा कार्यकर्ता म्हणून शोभणारी गोष्ट नव्हे. तसेच मुख्यमंत्री बनण्याची इच्छाही नव्हती, असे नाईक म्हणाले.
परंतु पक्षाने जबाबदारी सोपविली तर मात्र मी स्वीकारली असती, असेही नाईक यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या यशाची किती खात्री आहे हे सांगताना नाईक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशाने मान्य केले आहे. काँग्रेसला मागील वर्षापेक्षा कमी मते मिळणार आणि भाजपची मते वाढणार आहे, असेही ते म्हणाले.