लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोविंद गावडे मंत्री असताना मी कधीच त्यांच्या विरोधात गेलो नव्हतो, परंतु आपण मंत्री झाल्यानंतर मात्र त्यांनी आपल्या विरोधात आंदोलन केले, असे सभापती आणि एसटी नेते रमेश तवडकर यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तवडकर यांनी सांगितले की, यापूर्वी आपण जेव्हा मंत्री झालो हे काही एसटी नेत्यांना सहन झाले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्याविरुद्ध आंदोलन सुरू केले. याचे मला फार दुःख झाले. २०१७ ते २०२२ या काळात मी जेव्हा मंत्री नव्हतो आणि आमदारही नव्हतो तेव्हा आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री गोविंद गावडे होते. आयोगाचे अध्यक्ष हे प्रकाश वेळीप होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात मी आंदोलन केले नाही आणि काहीच त्रास दिला नाही, असेही तवडकर यांनी सांगितले.
बिरसा मुंडा जन्मशताब्दी सोहळ्यासाठी आमंत्रण नव्हते याचे मला फार काही वाटले नाही. तसेच मंत्री गोविंद गावडे काय बोलले याबद्दल मला फारसे पडलेले नाही. परंतु, त्यांच्या तीन कृत्यांनी मला फार दुखविले, असेही ते म्हणाले.
मच्छींद्र शिरोडकर यांच्या कार्यक्रमासाठी सरकारने पैसे दिले. यासाठी आपल्याला विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला. काणकोण रवींद्र भवनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या व्यासपीठावरही ते जे काही बोलले ते खटकणारे होते. उटाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचे झालेले भाषणही मला खटकले. मुख्यमंत्र्यांनी मी हे सर्व सांगितले आहे असे सभापती रमेश तवडकर म्हणाले.
त्या सभापतींना काडीची किंमत नव्हती?
तवडकर म्हणाले, की विधानसभेचे असेही काही सभापती होऊन गेले, की ज्यांना सरकारने काडीचीही किमत दिली नाही. त्यामुळेच शेवटी ते निवडणूकही लढविण्याच्या कुवतीचे राहिले नाहीत. राजेश पाटणेकर हे या बाबतचे जाज्वल्य उदाहरण आहे. मंत्र्यांनी आपल्यापुरतेच पाहिले तर राज्याचा विकास कसा होईल, असा प्रश्नही त्यांनी केला. मी जेव्हा सार्वजनिक कामे करीत असतो आणि त्यासाठी सरकारचा आणि मंत्र्याचा पाठिंबा हवा तसा मिळतो का असाही प्रश्न कधी कधी पडू लागतो. मी कोणत्याही पदाच्या स्पर्धेत नाही, ना मंत्रिपदाच्या, ना मुख्यमंत्रिपदाच्या, असे तवडकर म्हणाले.