- सदगुरू पाटील
पणजी : भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष हा पूर्णवेळ पक्षाचे काम करू शकेल असाच असावा असे मत मावळते प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शनिवारी व्यक्त केले. आपण सात वर्षे भाजपाचे चिकाटीने काम केले व त्याबाबत आपण आनंदी व समाधानी आहोत. आम्ही जर भाजपाची आमदार संख्या तेराच ठेवली असती तर आमचे गोव्यातील सरकार कधीच कोसळले असते, असेही तेंडुलकर यांनी लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीवेळी नमूद केले.
प्रश्न : भाजपाला आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल, तो कसा असावा असे वाटते?उत्तर : नव्या प्रदेशाध्यक्षाने पक्षासाठी पूर्णवेळ काम करायला हवे. मी स्वत: गेली सात वर्षे माझा सगळा वेळ गोव्यात भाजपासाठीच दिला. भाजपाची वाढ व्हावी म्हणून मी वावरलो. मी कुटूंबाकडे व माझ्या व्यवसायाकडेही लक्ष दिले नाही. सगळीकडे पाठ फिरवून फक्त पक्षाचेच काम केले. नवा प्रदेशाध्यक्षही पक्षासाठी झोकून देऊन रात्रंदिवस काम करणारा असायला हवा. मग तो कुणीही असो.
प्रश्न : तुमची सात वर्षाची प्रदेशाध्यक्ष पदाची कारकीर्द संपत असताना तुम्हाला काय वाटते?उत्तर : मी जेव्हा प्रदेशाध्यक्ष नव्हतो तेव्हा मी भाजपाचा सदस्य नोंदणी प्रमुख झालो होतो. माझ्या नेतृत्वाखाली तेव्हा गोव्यात प्रथमच 4 लाख 19 हजार सदस्य नोंदविले गेले. मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरही सदस्य नोंदणीचा वेग कायम राहिला. मी त्यामुळे समाधानी आहे. आता भाजपाकडे गोव्यातील दोन्ही जिल्हा पंचायती आहेत. शिवाय सर्वात जास्त ग्रामपंचायती, पालिका आहेत. भाजपाची व्याप्ती व संघटनात्मक बळ माझ्या कारकिर्दीत वाढतच गेले याचा आनंद वाटतो. मला दोन टर्म मिळाले. माझ्या जागी पर्यायी नियुक्ती होईपर्यंत मलाच प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाचे काम करता आले याविषयीही मी आनंदी आहे.
प्रश्न : तुम्ही भाजपामध्ये काही काँग्रेस व मगोपचे आमदार आणल्याबाबत काही कार्यकर्ते कुरबुरीही करतात. त्याविषयी तुम्ही काय म्हणाल?उत्तर : मी भाजपाचे काम करत असताना कोणतीच गोष्ट पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना न विचारता केली नाही. प्रत्येक मोठे पाऊल उचलण्यापूर्वी मी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची अगोदर परवानगी घेतली. 2017 च्या निवडणुकीत आमचे तेराच उमेदवार निवडून आले होते. समजा आम्ही अन्य पक्षांतील आमदारांना भाजपामध्ये प्रवेश दिला नसता व आमची आमदार संख्या तेराच ठेवली असती तर भाजपाची सत्ता कधीच गेली असती. मग सगळेच कार्यकर्ते कुरबुरी करत बसले असते. देशभर भाजपाने विविध पक्षांतील नेत्यांना प्रवेश दिला आहे. त्यातून पक्ष बळकट होण्यास मदत झाली. गोव्यातही पक्षाचा पाया वाढला. काहीही असो पण आमच्याकडे आज 27 आमदार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये राग लोभ व कुरबुरी असतातच पण सरकार टीकण्यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतात.
प्रश्न : तुम्ही प्रदेशाध्यक्षपदी नसताना यापुढे काय कराल?उत्तर : मी पक्षाचे काम निष्ठेने करत राहीन. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडीन. मला पक्षाने राज्यसभा खासदारपद दिले. मी सामान्य कुटुंबातून आलो व राज्यसभेवर पोहोचलो. माझ्या कामाची पावती पक्षाने मला कायम दिली. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी केलेल्या कामगिरीवेळी मला मनोहर पर्रिकर व श्रीपाद नाईक यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. माझ्या यशात त्या दोघांचा व संघटन मंत्री सतिश धोंड यांचा वाटा आहे. या तिघांनाही मी श्रेय देतो.