पणजी: जुने गोवे पोलिसस्थानकाची नवी सुसज्ज अशी इमारत एका वर्षात पूर्ण होईल. नव्या पोलिसस्थानकामुळे या परिसरातील सुरक्षा अधिक बळकट हाेईल असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्या वाढदिवसानिमित जुने गोवे पोलिसस्थानकाच्या नव्या इमारतीची मुख्यमंत्री यांनी पायाभरणी केली. तसेच पोलिसस्थानकाला टेम्पो ट्रॅव्हर्लरही प्रदान केला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार कृष्णा साळकर, पोलिस महासंचालक जस्पाल सिंग व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की जुने गोवे पोलिसस्थानकाला नवी व सुसज्ज अशी इमारत असावी ही बऱ्याच वर्षांपासूनची प्रलंबित मागणी होती. मात्र स्थानिक आमदार राजेश फळदेसाई यांनी या प्रकल्पाविषयी सरकारने नियमितपणे केलेल्या पाठपुराव्यामुळे ते शक्य झाले आहे. त्यामुळे या नव्या इमारतीची पायाभरणी झाली आहे. आमदार फळदेसाईंचे कुंभारजुवेच्या नागरिकांच्या प्रती असलेल्या वचनबद्धतेसाठी त्यांचे कौतुक आहे.जुने गोवे हे पर्यटन स्थळ असून येथे मोठया संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येतात. त्यातच पुढील वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचे शवप्रदर्शन असल्याने पर्यटकांच्या संख्येत अधिकच वाढ होईल. त्यादृष्टीने जुने गोवे पोलिसस्थानकाची ही नवी इमारत या परिसरातील सुरक्षा अधिक बळकट करण्यास फायदेशीर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.