पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर आहे; पण त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजपा व सत्ताधारी आघाडीतूनही सोमवारी पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे. गोव्याला नव्या मुख्यमंत्र्यांची तातडीने गरज आहे याची कल्पना गोवा फॉरवर्ड पक्ष आणि मगोप यांनाही आली आहे. सरकारमधील तीन मंत्री १७ किंवा १८ रोजी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांना भेटून राजकीय स्थिती त्यांच्यासमोर ठेवतील.पर्रीकर दोनापावल येथील निवासस्थानी आहेत. ते २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सत्तेतील घटक पक्ष पर्यायी मुख्यमंत्री कोण असेल, याची चर्चा करीत आहेत. शर्यतीत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे पुढे आहेत. मात्र, मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांची त्यांना मंजुरी नाही. गोवा फॉरवर्डचे नेते मंत्री विजय सरदेसाई यांचा राणे यांना पाठिंबा आहे. भाजपाच्या आमदारांच्या आजच्या बैठकीत राजकीय स्थितीविषयी चर्चा झाली.पर्रीकर यांनी दिल्लीतील एम्समध्ये उपचार पूर्ण केले नाहीत. रविवारी त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यामुळे भाजपामध्ये चिंता होती. पर्रीकर मंत्री किंवा आमदाराला भेटू शकलेले नाहीत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे हे सोमवारी त्यांना भेटले. पर्रीकर यांच्या निवासस्थानी कायम सरकारी डॉक्टर्स व १०८ रुग्णवाहिकाही आहे.काँग्रेसकडे १६ आमदार आहेत. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याने त्या पक्षाचे दोन आमदार फोडावेत, असा प्रयत्न भाजपा करीत आहे. सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांना भाजपाने गळ टाकलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला निवेदन सादर करून, काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी द्यावी, परस्पर विधानसभा करू नये, अशी मागणी केली आहे.
गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध; विश्वजीत राणे शर्यतीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 8:58 AM