मांडवी नदीत येणार नवी क्रूझ बोट; कंपनीच्या याचिकेवर न्यायालयात निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:23 PM2023-12-06T12:23:07+5:302023-12-06T12:24:06+5:30
नवीन स्वरूपातील सांता मोनिका क्रूझ बोटला मांडवीत नवीन स्वरूपात संचार करण्याची वाट मोकळी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सेलेस्टियल क्रूझ अॅण्ड हॉस्पिटॅलिटीच्या पर्यटन जहाजाची नोंदणी करण्यासाठी कंपनीने केलेला अर्ज पर्यटन महामंडळाने फेटाळला असला तरी उच्च न्यायालयाने अर्जदार कंपनीला दिलासा दिला आहे. त्यामुळे नवीन स्वरूपातील सांता मोनिका क्रूझ बोटला मांडवीत नवीन स्वरूपात संचार करण्याची वाट मोकळी झाली आहे.
सेलेस्टियल क्रूझ अँड हॉस्पिटॅलिटी कंपनीने सांतामोनिका पर्यटन बोटीच्या बदलीत नवीन पर्यटन बोटसाठी पर्यटन विकास महामंडळाकडे परवानगी मागितली होती. सुरुवातीला कंपनीचा अर्ज कोणताही निर्णय न घेता प्रलंबित ठेवण्यात आला होता. त्यामुळे कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी दहा दिवसांत अर्जावर निर्णय घेतला जाणार असल्याचे निवेदन सरकारकडून न्यायालयात करण्यात आले होते. त्यानंतर गोवा पर्यटन महामंडळाने अर्ज निकालात काढताना परवानगी नाकारली. सरकारने ९ मे २०२२ मध्ये नवीन क्रूझ बोटला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला होता. या बंदीच्या आदेशाचा निर्वाळा देऊन ही परवानगी नाकारण्यात आली होती.
कंपनीने पुन्हा न्यायालयात धाव घेऊन पर्यटन विकास महामंडळाच्या परवानगी नाकारण्याचा निर्णयाला आव्हान दिले. कारण सरकारच्या ज्या ९ मे २०२२ तारखेच्या आदेशाचा दाखला देत परवानगी नाकारण्यात आली होती. त्याच आदेशात क्रूझ बोटच्या अनेक प्रकारांना वगळण्यातही आले असल्याचे म्हटले आहे. त्या निकषांनुसार कंपनीच्या क्रूझ बोटला परवानगी देण्यास महामंडळ बांधिल ठरत असल्याचा युक्तिवाद कंपनीच्या वकिलाकडून करण्यात आला. खंडपीठाने हा युक्तिवाद ग्राह्य मानून कंपनीच्या क्रूझ बोटची दोन आठवड्यांच्या मुदतीत नोंदणी करण्याचा आदेश महामंडळाला दिला.