लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: येथील प्रसिद्ध अशा दोनापावला जेटीचे काल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. स्वदेश दर्शन योजने अंतर्गत जेटी विकसित केली आहे. मात्र, आता पर्यटकांना जेटीवर जाण्यासाठी ५० रुपये शुल्क मोजावे लागणार असून तसा सूचना फलकही जेटीवर लावण्यात आला आहे.
शनिवारी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्याहस्ते दोनापावला जेटीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगरसेवक नेल्सन काब्राल, पर्यटन खात्याचे अधिकारी दीपक नार्वेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.राज्यातील पर्यटन क्षेत्राला आहेत. यातून स्थानिक वेगळा आयाम देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विविध प्रकल्प, उपक्रम राबविण्यात येत व्यावसायिकांना फायदा होणार आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्र बाराही महिने सुरू राहावे आणि यातून अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळावी यासाठी पर्यटन खाते कार्यरत आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्र बहरण्यासाठी खूप वाव आहे. फक्त यासाठी सर्वांनी एकत्रीत येऊन काम करणे गरजेचे आहे. यासाठी सरपंच, पंच सदस्य, आमदार यांचा पाठिंबाही आवश्यक आहे. विकासासोबत लोकांच्या समस्या सोडविण्याचा आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.
दरम्यान, स्वदेश दर्शन अंतर्गत दोनापावला जेटी विकसित झाली त्याचप्रमाणे ग्रामीण पर्यटन विकसित करण्यावर आम्ही भर देणार आहोत. गावागावांत अनेक अशी स्थळे आहेत, जी बऱ्याप्रकारे पर्यटन स्थळे म्हणून पुढे येऊ शकतात. लवकरच स्वदेश अंतर्गत अनेक प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी पंतप्रधान मोदी यांचाही आम्हाला पाठिंबा मिळत आहे, असे खंवटे यांनी सांगितले.
गोमंतकीयांसाठी मोफत
दोनापावला जेटीवर प्रवेश देण्यासाठी पर्यटकांना प्रवेश शुल्क भरावा लागणार आहे, पण गोमंतकीयांसाठी मात्र प्रवेश मोफत असणार आहे. जेटीवर प्रवेश करण्यासाठी १८ वर्षांखालील मुलांना २५ रुपये तर १८ वर्षावरील सर्वांचे ५० रुपये आकारण्यात येणार आहेत. याबाबतचा फलकही येथे लावण्यात आला आहे.
शिल्लक कामे सरकारच्या पैशातून.....
दोनापावला जेटी लोकांसाठी खुली केली असली तरी त्याचे काहीसे काम शिल्लक आहे. हे काम राज्य सरकार आपल्या पैशाने करणार आहे. या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच स्थानिकांच्या सूचना देखील याबाबत घेण्यात आल्या आहेत. लवकरच हेही काम पूर्ण होणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"