पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री कोणत्याही वादात नाहीत तसेच येथील लोकही शांत आणि संयमी आहेत, त्यामुळे गोव्यात आपण शांततेत आणि चांगल्या प्रकारे कार्यकाळ पूर्ण करू शकेन, असा विश्वास नवे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, ‘जम्मू-काश्मीरमध्ये अनेक प्रश्न, समस्या होत्या. त्या यशस्वीपणे हाताळल्या. गोवा हा शांत प्रदेश आहे येथील मुख्यमंत्रीही वादग्रस्त नाहीत. ते कमी बोलतात, परंतु गोव्याने जगभरात नाव कमावले आहे. येथे काम करणे मला फार आवडेल.’
सत्यपाल मलिक यांना राजभवनवर आयोजित कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी शपथ दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, सभापती राजेश पाटणेकर, मंत्री मिलिंद नाईक, विश्वजित राणे, गोविंद गावडे, दीपक पाऊसकर, मायकल लोबो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर, आमदार एलिना साल्ढाना, महापौर उदय मडकईकर उपस्थित होते. गोवा फॉरवर्डच्या तिन्ही आमदारांनी मात्र बहिष्कार घातला. तसेच कामत वळगता काँग्रेसचे अन्य आमदार फिरकले नाहीत.
मलिक हे जम्मू-काश्मिरचे राज्यपाल होते. तेथून त्यांना गोव्यात राज्यपालपदी पाठवले आहे. मलिक हे १९६५ साली राजकारणात आले. लोहियांच्या समाजवादी तत्त्वांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. केंद्रात १९८९ मध्ये व्ही. पी. सिंग यांच्या सरकारात ते पर्यटनमंत्री होते. २00४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २0१७ मध्ये ते बिहारचे राज्यपाल होते तसेच ओडिशाच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त ताबा त्यांच्याकडे होता. २३ ऑगस्ट २0१८ रोजी त्यांनी जम्मू व काश्मिरच्या राज्यपालपदाची सूत्रे त्यांनी घेतली होती आता ते गोव्याच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळणार आहेत.