भावनिकदृष्ट्या समाजमनाशी जोडल्या गेलेल्या एखाद्या मोठ्या प्रकल्पाचे पूर्ण नूतनीकरण करून घेणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखे असते. कांपाल येथील रम्य ठिकाणी सुरेख अशा मांडवी नदीकिनारी गोव्याचा कला अकादमी प्रकल्प आहे. एकेकाळी अनेक मोठे साहित्यिक दिग्गज गायक, बॉलिवूड कलाकार व इतरांचे पाय या प्रकल्पातील भूमीला लागले. दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचे नाट्यगृह या प्रकल्पात आहे. आज १० रोजी नव्या तेजस्वी रूपातील कला अकादमीचे उद्घाटन होत आहे. गोमंतकीयांसाठी अभिमानाचा, आत्मगौरवाचा हा क्षण आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
कला अकादमीभोवती यापूर्वी मोठ्या वादाचे काहूर उठले होते. ज्यांनी वाद निर्माण केला, त्यांचा दोष नव्हता, कारण निविदा न काढता पन्नास कोटी रुपये खर्चून प्रकल्पाचे नूतनीकरण होतेय हा चर्चेचा व नाजूक विषय ठरला होता. विधानसभा अधिवेशनात आमदार विजय सरदेसाई व इतरांनी प्रचंड टीकेची झोड उठवली होती. अशाप्रकारे निविदा न काढता जनतेचे ४५-५० कोटी रुपये खर्च करता येत नाहीत, असे सरदेसाई यांचे म्हणणे होते. त्यावेळी बोलण्याच्या ओघात मंत्री गोविंद गावडे यांनी ताजमहलचे उदाहरण दिले होते.
जगप्रसिद्ध ताजची निर्मिती करताना शाहजहान यांनी निविदा जारी केली होती काय, असा प्रतिप्रश्न करून गावडे यांनी सरकारच्या कृतीचे समर्थन केले होते. अर्थात ती निविदा काही गावडे यांच्या कला व संस्कृती खात्याने काढली नव्हती. अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचाही त्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा होता. मात्र, विरोधकांनी पूर्ण सरकारला जाब न विचारता, फक्त गावडे यांनाच लक्ष्य बनविले होते. गावडे यांनी त्यावेळी शाहजहान यांच्या ताजमहलचे उदाहरण दिले, हे मात्र चुकीचे होते. त्या काळात निविदा काढून वास्तू उभारल्या जात नव्हत्या, हे ऐतिहासिक नाटकांमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या गावडे यांना कळायला हवे होते.
अर्थात कला अकादमीमुळे शाहजहान हा चेष्टेचा विषय झाला असला, तरी त्यातील विनोदाचा भाग आपण विसरूया. कारण कला अकादमीचे आजचे रूप हे अधिक तेजस्वी आहे व त्याचे श्रेय सरकारला द्यावेच लागेल. कला व संस्कृती खाते सांभाळणाऱ्या कोणत्याही मंत्र्यास काही विधाने करताना खूप काळजी घ्यावी लागते. गावडे यांना कला अकादमी वादातून हे कळाले असेलच. कला अकादमीला गळती लागली होती, त्यामुळे दुरुस्ती, नूतनीकरण गरजेचेच आहे, असा मुद्दा आम्ही पूर्वीही मांडला होता. मात्र, कलाकारांना विश्वासात घेण्याची भूमिका सरकारने घेतली असती तर अगोदरच लोकांचा पाठिंबा सरकारच्या निर्णयास मिळाला असता.
चार्ल्स कुरैय्या फाउंडेशनलाही कमी लेखण्याचा प्रयत्न अगोदर झाला होता. दुसरी गोष्ट म्हणजे कला अकादमी नव्याने खुली तरी कधी होणार, असे गोव्यातील सर्व रसिक श्रोते, प्रेक्षक व कलाकार विचारत होते. अकादमीत कुणीच जाऊ नये, तिथे कुणी काही पाहूदेखील नये, अशी व्यवस्था सरकारने केली होती. त्यामुळे टीकेचा सूर वाढला होता. स्मार्ट सिटी करण्याच्या नावाखाली सरकारने पणजीची पूर्ण वाट लावून ठेवल्याने लोकांत असंतोष होताच त्यात पुन्हा कला अकादमीचे सरकार काय बरे वाटोळे करून ठेवू पाहतेय, अशी शंका जनतेच्या मनात डोकावत होती. विरोधी आमदारांनी याच जनभावनेला अधिक धार देत राजकीय संधीचे सोने केले. वाद वाढवला.
मात्र, आता समाधान वाटतेय की, कला अकादमीचे दरवाजे आम जनतेसाठी व कलाकारांसाठी आजपासून खुले होत आहेत. लोकमतने काल कला अकादमीच्या नाट्यगृहाच्या आतील भागातील छायाचित्रे प्रसिद्ध केली. डोळ्यांचे पारणे फेडणारे ते चित्र आहे. अकादमीचा ब्लॅक बॉक्सदेखील पूर्वीसारखा सुंदर झाला आहे. अकादमीला आता पुन्हा लवकर गळती लागू नये किंवा पुन्हा लवकर दुरुस्ती करावी लागू नये. पर्रीकर सरकारनेही २३ कोटी रुपये खर्चून अकादमीची दुरुस्ती करून घेतली होती. आता चाळीस-पन्नास कोटी रुपये खर्चून केलेले काम जर टिकावू असेल तर लोक सावंत सरकारचे व विशेषतः मंत्री गावडे यांचेही पुढील अनेक वर्षे कौतुकच करतील. शाहजहान जिंकला हे मग मान्य करावे लागेल.