पणजी : गोव्यात प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पर्यटन क्षेत्रातील घटकांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. नव्या नेतृत्त्वाने पर्यटन उद्योगाची चाललेली घसरण थांबवावी, अशी मागणी या उद्योगाशी संबंधित घटकांनी केली आहे. यंदाच्या पर्यटक हंगामाचे आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. पर्यटन धोरण लवकरात लवकर तयार करणे आवश्यक आहे तसेच पायाभूत सुविधा निर्माण करणेही गरजेचे आहे. गेल्या वर्षभरात पर्यटन उद्योगासाठी विशेष असे काही केलेले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरचेवर केल्या जाणाऱ्या बदल्या तसेच नेतृत्त्वाचा अभाव ही या गोष्टींना कारणे ठरली होती, असे ट्रॅव्हल अॅण्ड टूर असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष सावियो मेशियस म्हणाले.स्वत: हॉटेलमालक असलेले मेशियस पुढे म्हणाले की, पर्यटकांना चांगल्या सुविधा पुरविणे आवश्यक आहे. मात्र दुर्दैवाने सरकारचे याकडे दुर्लक्ष चालले आहे. मंत्री आणि त्यांची खाती बदलण्याच्या नादात हे सरकार आहे. सध्या निवडणूक आचारसंहिता लागू आहे. सरकारी अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत आणि मंत्री प्रचारात गुंतले आहेत त्यामुळे अन्य कामे रखडली आहेत. पर्यटन क्षेत्रात जेथे कमकुवत गोष्टी आहेत तेथे त्या मजबूत करणे आवश्यक आहे.शॅक व्यावसायिकांची खंतअखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ म्हणाले की, पर्यटन उद्योगांच्या बाबतीत नियोजनात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. किनाऱ्यांवर पर्यटकांना कपडे बदलण्यासाठी खोल्या, प्रसाधनगृहांचा अभाव असल्याने पर्यटकांना बरेच त्रास सहन करावे लागतात. या पायाभूत सुविधांची नितांत गरज आहे.
गोव्यात नव्या नेतृत्वाने पर्यटन उद्योगाची घसरण थांबवावी, व्यावसायिकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 8:56 PM