- सुशांत कुंकळयेकरमडगाव: सरलेल्या 2019 सालात गोव्यात अंमलीपदार्थाच्या व्यवहाराने अगदी उच्छाद मांडला होता. त्यामुळे नव्या 2020 ची सुरुवात कशी होणार याबद्दल संपूर्ण गोवा साशंक होता. मात्र या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोरगाव पेडणे येथे तब्बल 50.90 लाखांचा अमली पदार्थ पकडल्याने नव्या वर्षाची सुरुवातच ड्रग्स केसने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो देश विदेशी पर्यटक गोव्यात आले असतानाच हा मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचा साठा जप्त केला.मानशीवाडा कोरगाव (पेडणे) येथे झालेल्या या कारवाईत पोलिसांनी इफेचुकवू डेव्हीड मडुक्वे या 30 वर्षीय नायजेरियनाला अटक करून त्याच्याकडे असलेला कोकेन जप्त केला. 2019 चे वर्ष संपताना 30 डिसेंबर रोजी मडगाव रेल्वे स्थानकावर केलेल्या कारवाईत आंतोनियो रामोस (42) या पोर्तुगालीन नागरिकाला अटक करून त्याच्याकडून 22.40 लाखांचा कोकेन व चरस जप्त केला होता. गोव्यात मोठय़ा प्रमाणावर अंमली पदार्थाचा व्यवहार चालू असल्याचे 2019 सालाने पुन्हा सिद्ध केले होते. मागच्या वर्षी गोव्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकात अंमली पदार्थ विषयक 155 प्रकरणे नोंद झाली होती. या एकूण कारवाईत 6.23 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले होते. तर या वर्षात एकूण 177 जणांना अशा कारवाईत अटक झाली होती. त्यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे यात 39 स्थानिकांचा समावेश होता. 87 इतर भारतीय नागरिकांचा तर 51 विदेशी नागरिकांचा समावेश होता. नोंद झालेल्या 155 प्रकरणांपैकी 83 प्रकरणे गांजाशी निगडीत होती. तर 72 प्रकरणे इतर सिथेंटीक ड्रग्स संदर्भातील होती.माजी पर्यटन मंत्री आणि बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी गोव्यात अंमली पदार्थाचा सुळसुळाट चालू असल्याचा आरोप करताना काही राजकारणी व पोलिसांची या ड्रग्स व्यावसायिकांशी मिलीभगत असल्यामुळेच हे व्यवहार खुलेआम चालू आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली. सनबर्नसारख्या संगीत रजनीसाठी गोव्यात येणारे पर्यटकही केवळ अंमली पदार्थाच्या सेवनासाठीच येत असतात. त्यासाठीच ते या महोत्सवावर बारा बारा लाख खर्च करतात. गोव्यात अंमली पदार्थाचा सुळसुळाट असल्यामुळेच चांगले पर्यटक गोव्यात येत नाहीत, असाही आरोप त्यांनी केला. 2019 साली ज्या 51 विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली त्यात 32 नायजेरियन, 11 रशियन, घाना व ऑस्ट्रियाचे प्रत्येकी दोन तर इटली, केनिया, नेपाळ व पोर्तुगालच्या एका नागरिकाचा समावेश आहे. 2020 सालाच्या पहिल्याच दिवशी अटक करण्यात आलेला विदेशी नागरिकही नायजेरियाचाच आहे.