मडगाव: दोन महिन्यांपूर्वी गोव्यातील दक्षिण गोव्यात सापडलेल्या नवजात अर्भकाचे गूढ उकलण्यास गोवा राज्य पोलिसांना यश आले असून, अनैतिक संबंध चव्हाट्यावर येऊ नये म्हणून त्या अर्भकाच्या मातेनेच हे त्याची हत्या केल्याचं कृत्य उघडकीस आलं आहे. राज्यातील दक्षिण गोव्यातील मडगाव पोलिसांनी आज गुरुवारी या प्रकरणाचा पर्दाफाश करताना त्या चाळीस वर्षीय महिलेसह तिचा प्रियकर कायतान पेरेरा (45) याच्याही मुसक्या आवळल्या.संशयित कायतान हा फुटबॉल रेफ्री असून, तो विवाहित आहे. उदया संशयितांना रिमांडसाठी न्यायालयापुढे उभे केले जाईल अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली आहे. 2 डिसेंबर 2018 रोजी मांडप - नावेली येथे एक नवजात अर्भक सापडले होते. येथे फुटबॉल खेळणा-या काही मुलांना झुडुपात लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर ते तेथे गेले असता, तेथे कुणीतरी नवजात अर्भकाला फेकून दिल्याचे आढळून आले होते. अर्भकाची नाळही तोडण्यात आली नव्हती. मागाहून त्या मुलांनी यासंबधी मडगाव पोलीस ठाण्याला कळविले होते. परिस्थितीचे गांर्भिय जाणून त्या मुलांनी त्या नवजात अर्भकाला लागलीच मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल केले होते. मागाहून त्या अर्भकाला फोंडा येथील मातृछायेत पाठवून देण्यात आले होते अशी माहिती मडगाव पोलिसांनी दिली.गेले दोन महिने पोलीस या प्रकरणाचा शोध घेत होते. तपासात या भागातील एक महिला त्यावेळी गरोदर होती, अशी माहितीही पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी काल गुरुवारी प्रथम त्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने आपला गुन्हा कबूल केला. नंतर तिने कायतान परेरा याचेही नाव पोलिसांना सांगितले. कायतान हा कुंकळळी येथे रेफ्री म्हणून गेला होता. दुपारी तो नावेली येथील एका शैक्षणिक आस्थापनात शिकणा-या आपल्या मुलांना घरी परत नेण्यासाठी आला असता, तेथे दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.संशयित महिलेला तिच्या पतीने तीन वर्षापुर्वी घटस्फोट दिला होता. त्यानंतर ती महिला आपल्या माहेरी रहात होती. याच दरम्यान तिचे कायतान याच्याशी सूत जमले होते. नंतर ती गरोदर राहिली होती. मुलाला जन्म दिल्यानंतर कायतानाने या अर्भकाचा काटा काढण्यास सांगितले होते. मात्र तिने तसे न करता त्या मुलाला मांडप येथे एका झुडुपात फेकून दिले होते. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 317 कलमाखाली संशयितांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशीष परब, हरिष नाईक, एलआयबी पोलीस पथकाचे गोरखनाथ गावस, समीर नागनुरी, बबलु झोरे, सुप्रिया गावकर व पोलीस वाहन चालक प्रशांत बोरकर यांनी कारवाई करताना संशयितांना पकडण्याची कामगिरी बजाविली.
अनैतिक संबंध चव्हाट्यावर येऊ नये म्हणून नवजात अर्भकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 11:17 PM