२०२७ मध्ये गोव्यात पुढचे सरकार काँग्रेसचेच येईल; माणिकराव ठाकरेंचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:03 IST2025-04-07T11:02:45+5:302025-04-07T11:03:50+5:30
कळंगुट येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

२०२७ मध्ये गोव्यात पुढचे सरकार काँग्रेसचेच येईल; माणिकराव ठाकरेंचा मोठा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : राज्यात २०२७मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत येईल आणि भाजप सरकारच्या कुशासनापासून गोवा मुक्त होईल, असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.
कळंगुट येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, महिला अध्यक्षा प्रतिक्षा खलप, गटाध्यक्ष लॉरेन्स सिल्वेरा, उत्तर गोवा अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर उपस्थित होते. माणिकराव ठाकरे म्हणाले की, 'गोव्यातील भाजप सरकार हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. बेरोजगारी, मोठ्या प्रमाणात केली जाणारी बेकायदेशीर भू रुपांतरे, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य सुविधेचा वाजलेला बोजवारा, सरकारचे कुशासन यामुळे गोव्यातील लोक सरकारला कंटाळले आहेत. त्यामुळे हे सरकार राज्यातून हद्दपार करण्याची गरज आहे.'
ठाकरे म्हणाले की, 'राज्यातील काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. गोव्याची ओळख, वारसा आणि भविष्य जपण्यासाठी तळागाळापासून प्रत्येकाने काम करण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पक्ष संघटना मजूबत केली जाईल. गोव्यातील नागरिकांना पारदर्शक, जबाबदार, लोकाभिमुख सरकारची गरज आहे, असे सरकार केवळ काँग्रेस पक्षच देऊ शकेल. त्यामुळे २०२७च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात परत एकदा काँग्रेस सरकार स्थापन व्हावे, काँग्रेसचेच सरकार यावे, यासाठी आम्ही पक्ष म्हणून कटिबद्ध असून, त्यादिशेने कामाची सुरुवात केली आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अमित पाटकर यांच्यासह इतर वक्त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.