पणजी : पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केले अशा बातम्या अनेकवेळा वृत्तपत्रातून झळकतात आणि टीव्हीवरही पाहायला मिळतात. हा अंमली पदार्थ म्हणजे केवळ देशी गांजा आणि फारतर त्याच्या पासून बनवलेला चरस. एक्स्टेसी, कोकेन यासारखा विदेशातून येणा-या ड्रग्सवर रोख लावण्यास सुरक्षा यंत्रणांना ब-याच अंशी यश मिळाले आहे. पोलिसांच्या भाषेत सांगायचे झाल्यास नायजेरीयन्सना नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले आहे.
विदेशातून होणा-या अंमली पदार्थांच्या तस्करीवर वचक बसला असल्यामुळे सध्या केवळ गांजा या देशांतर्गत उत्पादित अंमलीपदार्थाचे व्यवहार होत आहेत. जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंत मागील सहा पोलिसांनी छापा टाकलेल्या एकूण १९६ प्रकरणात केवळ ७ प्रकरणे इतर स्वरूपाची आहेत तर बाकी सर्व गांजाचीच आहेत असे पोलिसांचा अहवाल सांगत आहे. १ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंच्या छाप्यांचा अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही, परंतु या दोन महिन्यांच्या काळातही केवळ गांजाच जप्त करण्यात आला आहे. अपवाद केवळ मागील महिन्या अखेरीस हणजुणे येथे पकडण्यात आलेला ड्रग्स. तो ड्रग्सही त्या ठिकाणीच बनविण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. म्हणजेच विदेशातून येणारा अंमली पदार्थ जवळ जवळ बंद करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे ही वस्तुस्थिती आहे. सध्या पर्यटनचा हंगाम असतानाही असे व्यवहार उघडकीस आलेले नाहीत. मुख्य म्हणजे ड्रग्स व्यवहारात सर्वाधिक असलेले नायजेरीयन नागरीकांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. नायजेरीयन नागरिकांनी पर्वरी महामार्ग रोखून धरण्याच्या ऐतिहासिक प्रकारानंतर पोलीस यंत्रणांना खडबडून जाग आली होती व त्यादृष्टीने खबरदारीच्या उपाय योजना चालविण्यात आल्या होत्या.
व्हिसासंबंधीचे कडक करण्यात आलेले नियम. गोव्याच्या विदेश विभागाने लागू केलेले निर्बंध आणि व्हिसा तपासण्यासंबंधी वेळोवेळी करण्यात आलेल्या मोहिमा याचा हा परिणाम असल्याचे पोलीस विभागाच्या एका अधिका-याने सांगितले. मागे एका फ्रेंच नागरिकाला अटक करून त्याच्याकडून एमडीएमए व एलएसडी पेपर जप्त करण्यात आले होते, या सारखे अपवादही असले तरी एकंदरीत चित्र आश्वासक दिसत आहे.