पणजी: ड्रग्स व्यवहार नियंत्रणाखाली ठेवण्यात यश मिळालेले असले तरी, नायजेरियाच्या नागरिकांना गोव्यात बेकायदेशीर वास्तव्य करून राहण्यापासून रोखण्यास अद्याप यश मिळालेले नाही. एक गुन्हा करा व त्या आधारावर व्हिसाशिवाय बिनधास्तपणे गोव्यात राहा, हे त्यांचे तंत्र अजूनही प्रभावी ठरते आहे. नायजेरिय नागरिकांविरोधात नोंदवले जाणारे सर्वाधिक गुन्हे ड्रग्स प्रकरणातील होते. आता ड्रग्स प्रकरणात ते कमी पकडले जात आहेत. हल्ली गांजा शिवाय इतर विदेशी ड्रग्स सहसा पकडलाही गेलेला नाही. यावरून नायजेरियन लोकांवर ड्रग्सच्या बाबतीत नियंत्रण ठेवण्यात काही प्रमाणात पोलिसांना यश आले. परंतु आता व्हिसा उल्लंघनाचे गुन्हे या नागरिकांवर सर्वाधिक आहेत. एक तर त्यांच्याकडे व्हिसाच नसतो. व्हिसा हरवल्याचे ते सांगतात. असलाच तरी त्याची वैधता संपलेली असते. वैधता वाढविण्यासाठीही ते फार कमीच अर्ज करतात. व्हिसा उल्लंघनासाठी अटक केली जाऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ठराविक मुदतीत ते सुटतातही. परंतु या नोंदल्या गेलेल्या गुन्ह्याच्या आधारावरच ते कोणत्याही व्हिसाविना बिनधिक्कतपणे गोव्यात राहतात. पुन्हा त्यांना व्हिसा उल्लंघनासाठी अटक करून गुन्हा नोंदविण्यास पोलिसांनाही अडचण होते.
अशाच एका नायजेरियनना पेडणे पोलिसांनी अटक करून गुन्हा नोंदवला होता. तो सुटल्यावर त्याला पुन्हा एकदा याच कारणावरून अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला. तेव्हा त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात धाव घेतली. एकदा व्हिसा उल्लंघनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा तोच गुन्हा त्याच्याविरुद्ध कसा नोंदवू शकता, असा सवाल पोलिसांनाच खंडपीठाने विचारला. व्हिसा प्रकरणात गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांना अटक करून जामीनावर सोडले जाते, तेव्हा या प्रकरणात खटला पूर्ण होईपर्यंत देश न सोडण्याची अट असते. गुन्हा नोंद केल्यानंतर त्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करून खटला सुरू करून निवाडा होईपर्यंत अनेक वर्षेही जातात. परंतु खटला पूर्ण होईपर्यंत नायजेरीयन व्हिसाशिवाय गोव्यात राहतात.