लोकमत न्यूज नेटवर्क, केपे : नीलेश काब्राल यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद पक्षाच्या आणि सरकारच्या हितासाठी सोडले आहे. त्यांचा तो त्याग वाया जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले. काकोडा कुडचडे येथील आरोग्य केंद्राच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कुडचडेतील आरोग्य केंद्र हे राज्यातील फोंडा जिल्हा रुग्णालयानंतर दुसरे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. या प्रक्रियेसाठी थोडा वेळ जाणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, आमदार केदार नाईक, नगराध्यक्ष प्रदीप नाईक, आरोग्य विभागाचे संचालक गीता काकोडकर, आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी मेधा कुडचडकर, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सध्या ज्या सुविधा उपस्थित नाहीत, त्या लवकरच आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि स्थानिक आमदार नीलेश काब्राल यांच्या सहकार्याने दिल्या जाणार आहेत, तसेच इतर जे प्रकल्प हाती घेतले आहे तेही पुढच्या तीन वर्षांत पूर्ण केले जाणार आहेत. सध्या राज्याची आर्थिक स्थितीही बळकट आहे.
मंत्री विश्वजित राणे म्हणाले, कुडचडेतील आरोग्य केंद्राला दुसरे उपजिल्हा रुग्णालय करण्याची प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल.
आमदार नीलेश काब्राल म्हणाले, आजचे आरोग्य केंद्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्र्यांच्या सहकार्याने उभे झाले आहे. लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध होतील, अशी मी आशा ठेवतो. उद्घाटनाला वेळ लागला असला तरी सुविधा उपलब्ध नसताना केंद्र सुरू केले असते, तर सुविधा मिळाल्या नसत्या, असेही काब्राल म्हणाले.