पणजीः सार्वजनिक बांधकामंत्री निलेश काब्राल यांना मंत्रीमंडळातून वगळणार हे आता निश्चित झाले असून पुढील काही दिवसात ते मंत्रीपदाचा राजीनामाही देण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्री बनविण्यासाठी भाजप हायकमांडने हा निर्णय घेतल्याचे काब्राल यांना सांगण्यात आले आहे.
मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेले आलेक्स सिक्वेरा यांना मंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुणाला मंत्रिमंडळातून वगळावे यावर निर्णय झाला नसल्यामुळे मंत्रिमंडळ फेररचना अडली होती. आता काब्राल यांना वगळण्याचा निर्णय निश्चित झाला असल्यामुळे सिक्वेरा यांचे अच्छे दिन जवळ ठेपले आहेत. ३ डिसेंबरपर्यंत किंवा त्यापूर्वी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली जाऊ शकते अशी माहिती पक्षाच्या सूत्रांकडून देण्यात आली.
आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीमंडळात घेण्यासाठी कोणाच्याहाती नारळ द्यावा यासाठी तीन नावे चर्चेत होती, त्यातील काब्राल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. स्वतः काब्राल यांनीही ही शक्यता नाकारलेली नाही, मात्र अजून तरी आपल्याला राजीनामा देण्यास सांगितलेले नाही एवढेच ते बोलतात. भाजपच्या गोठातून मिळालेल्या माहितीनुसार काब्राल यांना भाजप हायकमांडने घेतलेल्या या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
दिल्लीवारी व्यर्थ
आपल्याला मंत्रीमंडळातून वगळण्यात येण्याची सुलूस लागल्यावर काब्राल यांनी दिल्लीत धाव घेतली होती. तिथे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांनाही ते भेटले होते. त्यांच्या भेटीदरम्यान काय बोलणी झाली याचा खुलासा काब्राल यांनी केला नसला तरी संतोष यांच्याक़ून त्यांना ठोस असे काहीच आश्वासन मिळाले नसल्याची खबर आहे.