पणजी : नागरी सेवेतील आठ कनिष्ठ श्रेणी आणि एका वरिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याच्या बदलीचा आदेश सरकारने काढला आहे. कृषी प्रशासन उपसंचालक महादेव आरोंदेकर यांची बदली डिचोली उपजिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. आरोंदेकर यांच्याकडे डिचोली पालिका मुख्याधिकारीपदाचा तसेच साखळीतील रवींद्र भवन सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षक दामोदर शंके यांना गोवा राज्य मागास व ओबीसी वित्त विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्यात आले आहे. उद्योग खात्याचे सरव्यवस्थापक दीपक देसाई यांच्याकडे अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. कोमुनिदाद मध्य विभागाच्या प्रशासक माया पेडणेकर यांच्याकडे माहिती आणि प्रसिध्दी खात्याच्या संयुक्त संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. महादेव आरोंदेकर यांना या पदातून मुक्त करण्यात आले आहे. बांधकाम खात्याचे भूसंपादन अधिकारी एस. पी. शिंगणापूरकर यांना कृषी खात्याच्या प्रशासन उपसंचालकपदाचा अतिरिक्त ताबा दिला आहे. डिचोली उपजिल्हाधिकारी बिजू नाईक यांची बदली प्रशासन सुधारणा विभागात अवर सचिवपदी केली आहे. तेथून शर्मिला झुझार्त यांना राज्य मानवी हक्क आयोगाच्या कार्यालयात अवर सचिवपदी पाठवले आहे. दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर यांची बदली सासष्टी उपविभागीय दंडाधिकारी १ या पदी केली आहे. त्यांच्या जागी संगीता नाईक यांना आणले आहे. खाण खात्याचे साहाय्यक संचालक मान्युअल बार्रेटो यांना मच्छीमारी खात्याच्या अवर सचिवपदी तर पालिका प्रशासक वेनान्सियो फुर्तादो यांच्याकडे ‘सुडा’च्या सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
नागरी सेवेतील नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Published: February 28, 2015 2:02 AM