पणजी - राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने नऊ शिक्षकांना मंगळवारी सायंकाळी राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर केले. काही मुख्याध्यापक, प्रिन्सीपल व अन्य स्तरावरील शिक्षकांचा यात समावेश आहे. आज बुधवारी पणजीत सकाळी दहा वाजता शिक्षक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा होईल व त्यावेळी शिक्षकांना हे पुरस्कार प्रदान केले जातील.
फोंडा तालुक्यातील बेतोडा-ताल- फोंडा येथील सरकारी प्राथमिक शाळेचे शिक्षक संभाजी राऊत यांना शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे वय 57 असून त्यांना ग्रामीण भागात 22 वर्षे विद्यादानाचा अनुभव आहे. मडगावच्या महिला व नूतन हायस्कुलच्या सहाय्यक शिक्षिका स्वेता सुहास प्रभुदेसाई यांनाही शिक्षक पुरस्कार घोषित झाला. प्रिन्सीपल विभागात पेडणो तालुक्यातील मांद्रे येथील सप्तेश्वर इन्स्टीटय़ूट फॉर हायरएज्युकेशनचे प्रिन्सीपल रामदास केळकर यांना पुरस्कार प्राप्त झाला. ते 57 वर्षीय असून त्यांना 27 वर्षे विद्यादानाचा अनुभव आहे.
हेडलॅण्ड सडा-वास्को येथील दिपविहार हायस्कुलच्या सहाय्यक शिक्षिका विल्मा परैरा यांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या 57 वर्षीय आहेत. इब्रामपूर-पेडणो येथील सातेरी विद्यामंदिराचे सहाय्यक शिक्षक सुभाष सावंत यांनाही शिक्षक पुरस्कार शिक्षण खात्याने घोषित केला आहे. त्यांचे वय 59 वर्षे व 7 महिने असे आहे. त्यांना 33 वर्षे व 7 महिने एवढा दीर्घ काळ विद्यादानाचा अनुभव आहे.
डिचोली येथील श्री शांतादुर्गा हायस्कुलचे सहाय्यक शिक्षक गजानन शेटय़े हे 58 वर्षे वयाचे आहेत. त्यांनी 32 वर्षे विद्यादान केले आहे. त्यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. निरंकाल- फोंडा येथील गणानाथ इंग्लीश हायस्कुलचे मुख्याध्यापक गिरीश तेंडुलकर हे 58 वर्षे वयाचे आहेत. त्यांना विद्यादानाचा 38 वर्षाचा अनुभव आहे. त्यांचीही राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य देवीदास कुडव यांनाही सरकारने पुरस्कार जाहीर केला आहे. मडगावच्या लोयोला उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका कोरा कुएल्हो आब्रियू यांनाही राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्या 56 वर्षे वयाच्या आहेत. त्यांनी 33 वर्षे विद्यादान केले आहे.