लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्रातील सरकार 'अपयश', 'असंवेदनशील' आणि 'अकार्यक्षम ' असल्याचे मागील ९ वर्षांत सिद्ध झाले आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. तसेच महागाई, बेरोजगारी आणि देशाच्या भूमीचे रक्षण करण्यात अपयश का आले, असा सवाल त्यांनी केला.
शनिवारी येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्लस फेरेरा आदी उपस्थित होते.
निरुपम म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ९ वर्षांत महागाई आणि बेरोजगारी कमीच होताना दिसत नाही. उलट आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब का झाले?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. सरकारने जनतेची दिशाभूल केली असा आरोप त्यांनी यावेळी केला.
नऊ वर्षांपूर्वी एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचे दरही दुप्पट झाले आहेत. खाद्यतेल आणि इतर अन्नधान्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. सरकार अनुदान आणि इतर मदत देण्यास अपयशी ठरल्याने शेती कामाचा दररोज वाढत आहे, असे सांगून निरुपम म्हणाले, काळा पैसा परत आणण्याचे विसरा, उलट ६८ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पळून गेलेल्या फरारांना या सरकारने संरक्षण दिले आहे, असे ते म्हणाले.
हे सरकार फक्त श्रीमंतांसाठीच राबणारे
'हे सरकार गरिबांसाठी नाही तर श्रीमंतांसाठीच राबणारे आहे. देशाची आर्थिक बाजू सांभाळण्यास ते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ते गरीब लोकांना मदत करू शकत नाही. महागाई कमी करू शकत नाही. भाजपने केवळ भांडवलदारांना मदत केली आहे, असा आरोपही काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केले.