लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : बेनोडे ते काणकोण यादरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या कामासाठी भू-संपादनाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, असे निर्देश केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मंत्र्यांनी हे निर्देश दिल्याचे तवडकर यांनी सांगितले. या शिष्टमंडळात काणकोण पालिकेचे नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर व शंभा नाईक देसाई आदींचा समावेश आहे.
तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली गेलेल्या या शिष्टमंडळाने यावेळी राष्ट्रीय महामार्ग ६६ वर प्रवेशद्वारावर असलेल्या काणकोण कारवार बायपास येथील वाहतूक बेटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा, असा प्रस्ताव मंत्री गडकरी यांना दिला. गडकरी यांनी हा प्रस्ताव स्वीकारला असून हा पुतळा उभारू, असे आश्वासन दिले. बेनोडे ते काणकोण प्रस्तावित महामार्ग १४ किलोमीटर लांबीचा आहे. त्यासाठी भू-संपादन आवश्यक आहे. या प्रकल्पावर ७६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही शिष्टमंडळाने मंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिले. मंत्री गडकरी यांनी भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने केली जाईल, असे आश्वासन दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"