पणजी : ‘झुवारी पुलाचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण केले जाईल,’ असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी जाहीर केले. राज्यातील रस्ते व पूल यांसारख्या विविध प्रकल्पांसाठी आणखी ८०४ कोटी मंजूर केले आहेत, याशिवाय गुंतवणूक प्रोत्साहन अंतर्गत ३,५०० कोटींच्या आठ नव्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे, अशी माहितीही यावेळी गडकरी यांनी दिली.
गडकरी यांच्या हस्ते चार वेगवेगळ्या प्रकल्पांचे लोकार्पण तर अन्य दोन प्रकल्पांची व्हर्च्युअल पद्धतीने पायाभरणी झाली. दोनापावल येथे हा कार्यक्रम झाला. पत्रादेवी ते करासवाडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वरील १८ किलोमीटरचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे, तसेच करासवाडा ते बांबोळी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील १३ किलोमीटरचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. मडगाव पश्चिम बगलमार्गाचे ५.७ किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे, तसेच वास्कोत बंदर कनेक्टिव्हिटी मार्गाचे कामही पूर्ण झालेले आहे. या चार प्रकल्पांचे गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले, तर मोपा विमानतळ कनेक्टिव्हिटी रोड व झुवारी पुलावरील ऑब्झर्व्हेटरी टॉवरसाठी पायाभरणी करण्यात आली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात वार्षिक योजनेत ८०४ कोटींचे १३ प्रकल्पांची मागणी केली होती. हे प्रकल्प मंजूर केल्याचे व कामेही लवकरच सुरू केली जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले, याशिवाय राष्ट्रीय महामार्गाची आणखी ४०० कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. विमानतळ ते वेर्णा मार्ग सिग्नलमुक्त केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
पणजी ते कर्नाटक हद्दीपर्यंत ६२ किलोमीटरची ७ हजार कोटी रुपये खर्चाचे काम नवीन वर्षात हाती घेतले जातील, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यावेळी उपस्थित होते. गडकरी यांनी रिमोटद्वारे प्रकल्पांचे लोकार्पण, तसेच पायाभरणी केली.