पणजी : मासळी आयातीवरील बंदी हा तोडगा नसल्याचे राज्य शिवसेनेने म्हटले असून फॉर्मेलिनचे प्रकरण हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. याबाबतीत कायमस्वरुपी तोडगा आरोग्यमंत्र्यांनी द्यावा, असे पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा प्रवक्त्या राखी नाईक यांनी म्हटले आहे.त्या म्हणतात की, फॉर्मेलिनच्या मुद्यावर राज्य सरकार पूर्णत: दिशाहीन बनले आहे. मासळीच्या आयातीवर ६ महिन्यांची बंदी हा उपाय नव्हे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी यावर कायमचा उपाय शोधायला हवा. मासळीमध्ये फॉर्मेलिन सापडले की नाही याचे त्यांनी आधी स्पष्टीकरण द्यावे. जर फॉर्मेलिन सापडले असेल तर दोषींवर काय कारवाई झाली याचा खुलासा व्हायला हवा. फॉर्मेलिनयुक्त मासळीची आयात करणाऱ्या घाऊक व्यापा-यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि जर फॉर्मेलिन सापडले नसल्यास आयातीवर बंदी का याचाही खुलासा झाला पाहिजे. गोव्यात लोकांनी मासे खाणे बंद केले आहे, त्यामुळे राणे यांनी मौन सोडावे आणि लोकांची सुरू असलेली ही फसवणूक थांबवावी
मासळी आयातीवर बंदी हा तोडगा नव्हे : शिवसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 9:25 PM