मडगाव: आजपर्यंत ज्या विदेशी पर्यटकांवर गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांचा भरवसा होता त्या ब्रिटिश पर्यटकांनीच यावेळी गोव्याकडे पाठ फिरवली आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत तरी युकेची चार्टर विमाने गोव्यात आणली जाणार नाही असे टीयुआय एअरव्हेज या चार्टर विमान कंपनीने जाहीर केले आहे.
या कंपनीचे ग्रुप पर्चेसिंग संचालक हेलन कॅरन यांनी गोव्यातील आपल्या प्रतिनिधीला लिहिलेल्या पत्रात ' भारतातील आंतरराष्ट्रीय विमानोड्डाण धोरण अजूनही स्पष्ट न झाल्याने गोव्यात पर्यटक आणण्याचा विचार आम्ही डिसेंबर पर्यंत तरी सोडून दिला आहे ', असे म्हटले आहे.
दुसऱ्या बाजूने रशियन पर्यटकही यंदा गोव्यात येणार याचीही पर्यटन उद्योजकांना शाश्वती नाही. हे पर्यटकही दुसऱ्या ठिकाणी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोव्यात सर्वात मोठ्या प्रमाणावर रशियन पर्यटक येत असून त्यांच्या पाठोपाठ ब्रिटिश पर्यटकांचा नंबर लागतो. मागच्या मोसमात युके तून दर आठवड्याला 5 चार्टर विमाने येत होती. यावेळीही युके च्या या चार्टर कंपनीने गोव्यात विमाने आणण्याची तयारी दाखविली होती. पण केंद्र सरकारने अजून आपले धोरण निश्चित न केल्याने या कंपनीने आपला बेत बदलला आहे.
गोव्यातील टीटीएजी या पर्यटन व्यावसायिकांच्या संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा यांनी ही गोष्ट गोव्यातील पर्यटनासाठी मारक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, याचसाठी आम्ही निदान युके आणि रशिया या दोन देशासंधर्भात तरी केंद्र सरकारने वेगळे धोरण ठरवावे अशी मागणी गोवा सरकारकडे केली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला तसे पत्रही पाठविले होते. पण केंद्र सरकारने अजून आपले धोरण निश्चित केलेले नाही . त्यामुळे ब्रिटीश कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
या संघटनेचे माजी अध्यक्ष सावियो मासाईस म्हणाले, जानेवारीत ब्रिटिश गोव्यात येऊ शकतात पण त्यासाठी धोरण निश्चिती आताच झाली पाहिजे. कुठल्याही पर्यटकाला कुठेही जायचे असेल तर त्याला सुट्ट्यांचे आणि पैशांचे नियोजन करावे लागते यासाठी किमान दोन तीन महिने लागतात असे ते म्हणाले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पर्यटक यावेळी गोव्याकडे पाठ फिरवितील अशी अपेक्षा असताना ती कसर यंदा देशी पर्यटक भरून काढतील अशी या उद्योजकांना आहे. यावेळी कोविडमुळे देशातील पर्यटक विदेशात जाण्याचे बहुतेक टळतील असे पर्यटक गोव्यात येतील अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत.