लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी सामाजिक संघटनांनी शेती, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन आणि फुल उत्पादन व्यवसायात उतरावे. आपण करतो ते, हलके काम असा विचार ठेऊन गोमंतकीय वागले तर गोवा कधीच स्वयंपूर्ण होणार नाही. उलट इतर राज्यावर अवलंबून राहण्याच्या प्रमाणात वाढ होईल. त्यासाठी अहंकार बाजूला ठेऊन आपल्या पारंपरिक व्यवसायाच्या वाढीसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमोणा येथे केले.
अखिल भारतीय ओबीसी महासभा ट्रस्टतर्फे यावर्षी प्रथमच घाडीवाडा आमोणा येथे पूजण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात ओबीसी समाजात विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय ओबीसी महासभा ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत घाडी, सचिव- विठोबा घाडी, सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष मनोज वायंगणकर, स्थानिक पंच वासुदेव घाडी, पंकज नमशीकर आदींची उपस्थिती होती.
अनेक सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधींबरोबरच सामाजिक संस्थांनीही लोकांमध्ये जागृती कार्यकरावे. स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेबरोबरच अंत्योदय तत्वावर काम करण्याचे आपले ध्येय आहे. हे ध्येय आपण एकाकी साध्य करू शकत नाही. त्यासाठी राज्यातील विविध सार्वजनिक, सामाजिक संस्थांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांनी गोव्याला सर्व क्षेत्रात पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन लोकांमध्ये जागृती व प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम करावे, असेही मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.
या सोहळ्यात अखिल भारतीय ओबीसी महासभा ट्रस्टच्या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष घाडी यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. पंकज नमशीकर यांनी सूत्रसंचालन केले.
या मान्यवरांचा गौरव
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते अॅड. विद्या गावडे सतरकर, विश्रांती नाईक, अजित पोरोब, सदाशिव गोवेकर, रॉयला फर्नाडिस, मनोज वायंगणकर, आत्माराम गावकर, कालिदास घाटवळ, वासुदेव घाडी, उल्हास परब, दीक्षा कांदोळकर, कायतानो फर्नांडिस, सुनील फडते, विठोबा घाडी, बेबी घाडी, महेश शिलकर यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर माजी सभापती स्व. अनंत शेट, माजी उपसभापती स्व. विष्णू सूर्या वाघ, पत्रकार स्व. औदुंबर च्यारी, स्व. गोविंद हिरवे यांचाही मरणोत्तर सत्कार करण्यात आला.