लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सर्व अभयारण्यांमध्ये तसेच वनक्षेत्रातील धबधब्यांवर लोकांना प्रवेश बंदी लागू करणारे परिपत्रक काल वन खात्याने जारी केले आहे. अतिरिक्त प्रधान मुख्य वनपाल व मुख्य वन्यप्राणी वॉर्डन उमाकांत यांनी हे परिपत्रक काल काढले. राज्यात मुसळधार पावसामुळे नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने सर्व अभयारण्यांमध्ये व धबधब्यांवर लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
नेत्रावळी, सांगे येथे मैनापी धबधब्यावर दोघांचा बुडून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा आदेश वन खात्याने काढला आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रवाहाने धबधबे वाहतात. तेथे भेट देणाऱ्या व आंघोळीसाठी उतरणाऱ्यांच्या जीवावर बेतते. त्यामुळे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रवेश बंदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वनमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, पावसाळ्यात वेगाने कोसळणाऱ्या व असुरक्षित धबधब्यांबाबत मी वन खात्याच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल मागितला आहे. तूर्त वन क्षेत्रातील सर्व धबधब्यांवर प्रवेश बंदीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. अहवाल हाती आल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसात कुठले धबधबे लोकांसाठी खुले करावेत आणि कुठले बंद ठेवावेत, यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाईल.
पावसाळ्यात खास करून जंगलांमध्ये किंवा अभयारण्यात अनेक धबधबे वाहतात व मान्सून काळात 'पिकनिकसाठी ते लोकांचे आकर्षण ठरतात. वीकएंडला या धबधब्यांवर मोठी गर्दी असते. परंतु वन खात्याच्या परिपत्रकामुळे या ठिकाणी आता प्रवेश बंदी लागू झालेली आहे. सत्तरी, काणकोण सांगे तालुक्यांमध्ये अनेक लोकांचा अभयारण्यांशी संबंध येतो. त्यांनाही प्रवेश बंदी लागू झाली आहे.
बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश
सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी मैनापी धबधब्यावरील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काल तातडीची बैठक घेऊन धबधब्याला भेट देणारे स्थानिक तसेच पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलिस, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते उपस्थित होते.
हलगर्जीपणा मान्य
फळदेसाई म्हणाले की, रविवारी झालेल्या या दुर्घटनेमुळे प्रशासनाचा तसेच वन खात्याचा हलगर्जीपणा दिसून आला. मैनापी धबधब्याला हजारो पर्यटक भेट देत असतात. तेथे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना व्हायला हव्यात. या अनुषंगाने बैठकीत मी आवश्यक ते निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले असून तातडीने काही गोष्टी करून घेणार आहे