पणजी- गणेश चतुर्थी सण जवळ आला तरी सरकारने दयानंद सामाजिक सुरक्षा योजने (डीएसएसएस) ची रक्कम अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली नसल्याने समाज कल्याण खात्यावर धडक मोर्चा नेला जाईल असा इशारा गोवा फॉरवर्डचे नेते दुर्गादास कामत यांनी दिला आहे.
डीएसएसएस योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरीक, विधवा महिलांना दर महिन्याला अडीच हजारांपर्यंतची रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून मिळते. समाज कल्याण खात्याकडून ही योजना राबवली जाते. मात्र महिना सुरु होऊन दहा दिवस उलटले तसेच गणेश चतुर्थी तोंडावर आली तरी लाभार्थ्यांना अजूनही ही रक्कम मिळाली नसल्याचा आरोप कामत यांनी केला आहे.
पुढील दोन दिवसांत जर लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही, तर समाज कल्याण खात्यावर धडक मोर्चा नेला जाईल. राज्यातील भाजप सरकारला नेहमीच डीएसएसएस तसेच अन्य सामाजिक योजनांची रक्कम वेळेत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास अपयश येते. यापूर्वीही असे अनेकदा झाले आहे. चतुर्थी हा सण गोव्यात मोठया भक्तीभावाने साजरा केला जातो. चतुर्थीला केवळ सात दिवस शिल्लक असून या योजनेची रक्कम कधी मिळणार याकडे लाभार्थ्यांचे लक्ष आहे. किमान सणावारी कडे तरी हे अपेक्षित नसल्याची टीका कामत यांनी केली.