पणजी : सध्या अस्थिरतेसारखी स्थिती असली तरी, भाजपाच्या सर्व आमदारांनी संघटीत रहावे. विद्यमान सरकारचे नेतृत्व हे भाजपाकडेच राहील, अशी ग्वाही भाजपाच्या सर्व आमदारांच्या शनिवारी येथे झालेल्या बैठकीत पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकाकडून आमदारांना देण्यात आली. पक्षाचे केंद्रीय नेते योग्यवेळी योग्य तो निर्णय घेतील, असे पक्षाचे संघटनात्मक काम पहाणारे राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी बी. एल. संतोष यांनी बैठकीवेळी सांगितले.
येत्या मंगळवारी पक्षाचे केंद्रीय नेते तथा केंद्रीय जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी हे गोव्यात येत आहेत. खनिज खाणींचा विषय हाताळणs हा गडकरी यांच्या भेटीचा प्रमुख हेतू आहे. त्या भेटीची पूर्वतयारी म्हणून बी. एल. संतोष हे शनिवारी गोव्यात आले व त्यांनी बैठका घेतल्या. ते काही माजी व काही विद्यमान आमदारांना व्यक्तीगरित्याही भेटले. भाजपाच्या पणजीतील कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता त्यांनी आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत अकरा आमदारांनी भाग घेतला. पर्रीकर यांची प्रकृती कशीही असो पण शेवटपर्यंत सरकारचे नेतृत्व त्यांच्याकडेच रहावे, अशी अपेक्षा काही आमदारांनी बैठकीत व्यक्त केल्याचे सुत्रांनी सांगितले. मंत्री विश्वजित राणो हे बैठकीला आले नाहीत पण ते बैठकीपूर्वी संतोष यांना स्वतंत्रपणो भेटले व त्यांनी संतोष यांना सद्यस्थितीची माहिती दिली.
राज्यातील राजकीय स्थितीविषयी काहीजण अफवा पसरवत आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका. कुठलाच दुसरा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. सरकारचे नेतृत्व हे कायम भाजपकडेच राहील. कोणता निर्णय कधी घ्यावा हे पक्षश्रेष्ठी ठरवतील, असे बी. एल. संतोष यांनी स्पष्ट केल्याचे आमदारांच्या बैठकीनंतर उपसभापती मायकल लोबो यांनी पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांची प्रकृती बरी आहे, असे पक्षाचे आमदार राजेश पाटणोकर यांनी पत्रकारांना सांगितले.
महामंडळ स्थापन करा खनिज खाणींचा प्रश्न हा तीव्र झालेला आहे. खाणबंदीचा फटका हा चाळीसही मतदारसंघांत बसेल. पर्यटनाला व राज्याच्या आर्थिक स्थितीलाही मार बसेल. यामुळे खाणी लवकर सुरू केल्या जाव्यात अशी मागणी आम्ही केली. पंतप्रधानांच्या कार्यालयानेही खाणींचा विषय गंभीरपणो घेतला असून काही तरी उपाय केंद्र सरकार निश्चितच काढील. गडकरी हे त्याचसाठी गोव्यात येत आहेत. प्रसंगी केंद्रीय खाणमंत्री नरेंद्रसिंग तोमर हे देखील गोव्यात येतील, असे संतोष यांनी आम्हाला सांगितल्याचे लोबो म्हणाले. खनिज लिजेस सरकारच्या ताब्यात रहावीत व खाणी परप्रांतीयांच्या हाती जाऊ नयेत म्हणून आम्ही गोवा सरकारने खनिज महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केल्याचे पाटणोकर यांनी सांगितले. लिलावाला हरकत नाही पण खाणी सरकारकडे किंवा गोमंतकीयांकडे राहिल्या तर स्थानिकांनाच नोकरी मिळेल, असे पाटणोकर म्हणाले.
संघटना नेस्तनाबूत पक्षाच्या संघटनेचे काम ठप्प होण्याची गरज नाही पण ते सध्या ठप्प झाले आहे, असे काही माजी आमदारांनी बी.एल. संतोष यांना स्वतंत्रपणो भेटून सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आणि राज्यसभा खासदारपद हे एकाच नेत्याकडे आहे. खासदार झाल्यानंतर विनय तेंडुलकर यांना दिल्लीत वेळ द्यावा लागतो. त्यामुळे गोव्यातील पक्ष कामावर परिणाम होतो. दुसरा प्रदेशाध्यक्ष नेमला जावा, असा मुद्दा एका माजी आमदाराने संतोष यांच्याकडे मांडला. मुख्यमंत्री आजारी असल्याने सरकार ठप्प झाले हे समजता येते पण पक्ष संघटना ठप्प होण्याची गरज नाही असे मत त्या माजी आमदाराने व्यक्त केल्याचे सुत्रंनी स्पष्ट केले.