पणजी - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दोन दिवसांच्या गोवा भेटीवर शनिवारी दुपारी आगमन झाले. त्यादिवशी गोवा मुक्ती दिन सोहळ्यात सायंकाळी राष्ट्रपतींनी भाग घेतला. या सोहळ्याच्यादुसऱ्या दिवशी रविवारी कोविंद यांनी येथूनच अवघे 16 किमी दूर असलेल्या मर्दोल (Mardol) येथील प्रसिद्ध महालसा नारायणी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा राष्ट्रपती मंदिर परिसरात पोहोचले तेव्हा तिथे एका जोडप्याचं लग्न होत होतं. त्यावेळी राष्ट्रपतींनी लग्नाला हजेरी लावत नवविवाहितांना आशीर्वाद दिला. त्यामुळे, या एका लग्नाची अनोखी कहाणी अजरामर झाली.
पोर्तुगीजांच्या राजवटीतून गोवा मुक्त झाला, त्यास साठ वर्षे होत आहेत. यापूर्वी कधीच गोवा मुक्ती दिन सोहळ्यात सहभागी होण्याची संधी देशाच्या कुठल्याच राष्ट्रपतींना मिळाली नव्हती. कोविंद यांना ही संधी मिळाली. गोवा मुक्तीची साठ वर्षे वर्षभर साजरी करायची असे सरकारने ठरवले आहे. त्यासाठी, रामनाथ कोविंद यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलविण्यात आले होते. या सोहळ्याच्यादुसऱ्या दिवशी रविवारी कोविंद यांनी येथूनच अवघे 16 किमी दूर असलेल्या मर्दोल (Mardol) येथील प्रसिद्ध महालसा नारायणी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रपती कोविंद यांचा मंदिर दौरा अचानक ठरला. त्यामुळे मंदिर प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाची धांदल उडाली होती. कोविडमुळे आधीच लांबणीवर पडलेलं लग्न आता मोजक्याच पाहुण्यांसमवेत मंदिरात उरकण्यात येत होतं. मात्र, राष्ट्रपतींचा दौरा ठरल्याने अचानक लग्न रद्द होते की काय, पुढे ढकलावं लागतं की काय, मुहूर्त टाळावा लागतो की काय, असे प्रश्न संबंधित जोडपं आणि कुटुंबीयांच्या मनात होते. मात्र, राष्ट्रपतींनी मनाचा मोठेपणा दाखवत लग्न वेळेवर लागून दिले, त्यानंतर मंदिरात जाऊन नवविवाहित जोडप्यास आशीर्वाद आणि शुभेच्छा पत्रही दिले. राष्ट्रपतींच्या या निर्णयाचं गोव्यात मोठं कौतुक होत आहे.
राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या लग्नाच्या उपस्थितीचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत. “असं क्वचितच होतं की एका मंदिरात राष्ट्रपती यांचा कार्यक्रम आणि कुठला लग्न सोहळा सोबत पार पडेल. पण, जेव्हा राष्ट्रपती कोविंद यांनी महालसा मंदिरचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिला आणि तो क्षण त्यांच्यासाठी आणखी खास बनला.”, असा संदेशही लिहिण्यात आला आहे.
राष्ट्रपतींसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही जोडप्याला आशीर्वाद दिले. ना मनी, ना ध्यानी... पण थेट मुख्यमंत्र्यांपासून ते राष्ट्रपतींसारख्या दिग्गजांनी लग्नाला उपस्थिती लावल्याने कुटुंबं आणि पै-पाहूणे आवाक झाले, सर्वांनाचा अत्यानंद झाल. दरम्यान, येथील महालसा नारायणी मंदिर हे गोव्याच्या मर्दोल शहरात वसलेले देवी महालसा समर्पित हिंदू मंदिर आहे, येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात.