पणजी : राजधानी शहरात किंग मोमोच्या आगमनाने कार्निव्हलची धूम सुरू झाली असून उद्या रविवारी शहरातील १८ जून मार्ग या प्रमुख रस्त्यावर दुपारनंतर 'नो मोटर झोन' आयोजित करून विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.कार्निव्हल समितीवरील पदाधिकारी तथा नोमोझोचे आयोजन पाहणारे नगरसेवक उदय मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या दुपारी ४ वाजता १८ जून रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून रात्री १० नंतर तो खुला केला जाईल. या काळात या रस्त्यावर सायकल स्पर्धा, कराटे शो, ज्युडो, गरबा तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जाणार असून संगीत शो देखील होतील. राजधानीतील नेहमी गजबजलेला आणि वर्दळीचा ठरलेला हा रस्ता उद्या कार्निव्हलच्या निमित्ताने पादचाऱ्यांसाठी मुक्त विहारासाठी खुला असेल. या रस्त्यावर कोणतीच वाहतूक होणार नाही. कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे मडकईकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, कार्निव्हलच्या निमित्ताने लोकांना रस्त्यावर मुक्तपणे फिरता यावे, पर्यटकांना शहरातील कार्निव्हलचा आनंद लुटता यावा यासाठी नोमोझोचे आयोजन आहे.आज कार्निव्हल मिरवणुकीला हजारो लोकांनी तसेच पर्यटकाने उपस्थिती लावली. त्यानंतर सायंकाळी येथील चर्च चौकात सांबा स्क्वेअरमध्ये विविध कार्यक्रम झाले. पाश्चात्त्य संगीताच्या तसेच कोकणी कांताराच्या ठेक्यावर तरुणाईची पावले थिरकली. सांबा स्क्वेअरमध्ये कार्यक्रमाच्या वेळी मडकईकर यांनी व्यवस्थापन हाताळले. उशिरापर्यंत या ठिकाणी संगीताचे कार्यक्रम चालू होते. डीजे, पाश्चात्य संगीताने लोकांना रिझवले. या ठिकाणी खाद्य महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यासाठी स्थानिकांबरोबर देशी-विदेशी पर्यटकांनी उपस्थिती लावून येथील खाद्यसंस्कृतीचा आनंद लुटला.
पणजीत उद्या नो मोटर झोन; कार्निव्हलनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 10:13 PM