पर्रीकरांची खुर्ची घटक पक्षांनी राखली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 12:30 PM2018-09-04T12:30:15+5:302018-09-04T12:41:05+5:30
सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्ष यांनी मिळून पर्रीकर यांची खुर्ची राखली हे आता स्पष्ट होत आहे.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आता अमेरिकेत असताना गोव्यातील भाजपाप्रणीत आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला पण सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्ष यांनी मिळून पर्रीकर यांची खुर्ची राखली हे आता स्पष्ट होत आहे. दोनपैकी एक जरी घटक पक्ष हलला असता तरी, सरकार अल्पमतात आले असते व गोव्यात राजकीय अस्थिरता सुरू झाली असती.
मुख्यमंत्री पर्रीकर आजारी असल्याने त्यांना वारंवार उपचारांसाठी मुंबईला आणि अमेरिकेत जावे लागत आहे. तिथे त्यांना रुग्णालयात आठपेक्षा जास्त दिवस रहावे लागते. यावेळी तिसऱ्यांदा पर्रीकर अमेरिकेतील स्लोन केटरींग स्मृती फाऊंडेशन रुग्णालयात उपचारांसाठी आहेत. गोवाभाजपाचे आणखी दोन मंत्री रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशावेळी गोव्यात नेतृत्व बदल व्हायला हवा असा विचार भाजपाचेही काही आमदार करताना दिसून येतात. भाजपाच्या कोअर टीमनेही सध्याच्या राजकीय स्थितीबाबत विचारमंथन चालविले आहे. सरकार टिकवून ठेवण्याची कसरत भाजपाही करत आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे अमेरिकेहून येत्या 8 रोजी गोव्यात परततील असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी नुकतेच जाहीर करून भाजपाच्या आमदारांना धीर दिला आहे.
काँग्रेस पक्षाने पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी चाचपणी चालवली आहे. काँग्रेसने राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. गोव्यात मुख्यमंत्री उपस्थित असत नाहीत व त्यांनी कुणाकडेच मुख्यमंत्रीपदाचा ताबा न सोपविल्यामुळे व अन्य दोन मंत्री कायम रुग्णालयातच असल्याने गोव्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांचे म्हणणे आहे. आम्ही या पेचप्रसंगाविषयी राज्यपालांना माहिती देणार आहोत. सरकार बरखास्त केले जावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपाकडे फक्त 14 आमदार आहेत. त्यामुळे सरकारचा डोलारा फक्त महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड या दोन पक्षांवर अवलंबून आहे. जर यापैकी एक पक्ष काँग्रेसच्याबाजूने गेला व एक किंवा दोन अपक्ष आमदार काँग्रेसला मिळाले तर काँग्रेसप्रणीत आघाडी सरकार स्थापन होऊ शकते. महाराष्ट्रवादी गोमंतकचे नेते असलेले व पर्रीकर मंत्रिमंडळातील बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आम्हाला पर्रीकर हेच नेते म्हणून हवे आहेत, असे सांगून काँग्रेसचा हात झिडकारला आहे. सरकार स्थापनेसाठी काँग्रेस पक्ष आमच्या मगो पक्षाला सिग्नल्स पाठवत आहेत. त्यांनी सिग्नल पाठविणे बंद करावे, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. गोवा फॉरवर्ड पक्षानेही पर्रीकर हेच आपले नेते आहेत व नेतृत्व बदलाचा प्रश्न येत नाही अशी भूमिका घेऊन पर्रीकर यांची खुर्ची स्थिर राखण्यास मदत केली आहे.