लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'पेडणे तालुक्यात मला कोणीही अडवू शकणार नाही. हसापूरपासून किरणपाणीपर्यंत कुठेही मी जाऊ शकतो. मी मांद्रे मतदारसंघाचा आमदार असलो तरी पेडणेत माझा संपर्क आहे, असे विधान आमदार जीत आरोलकर यांनी केले.
पेडण्यातील आंदोलक टॅक्सी व्यावसायिकांच्या भेटीला गेल्याने पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, मी पेडण्यात राहतो. माझे नातलग, मित्रमंडळी पेडण्यात आहेत. मी लोकप्रतिनिधी म्हणून टॅक्सी व्यावसायिकांना भेटायला गेलो होतो. कोणताही हस्तक्षेप वगैरे करण्यासाठी नव्हे.'
जीत म्हणाले की, टॅक्सी व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्यास स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर सक्षम आहेत. मला यात हस्तक्षेप करायचा नाहीय. मी किनारी भागाचा आमदार असल्याने टॅक्सीच्या विषयाकडे माझाही संबंध येतो. टॅक्सी व्यावसायिकांबद्दल मला सहानुभूती आहे. परंतु मोपा विमानतळावरुन गोवा माइल्सचा काउंटर हटवणे तसे शक्य नाही. मुख्यमंत्र्यांनीही हे स्पष्ट केलेले आहे.'