लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: नोकरी विक्री प्रकरणात अजूनपर्यंत कुणालाही 'क्लीन चिट' देण्यात आलेली नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. या प्रकरणात सखोल तपास होणार आहे आणि कुणीही गुन्हेगार सुटणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीच्या पहिल्या पत्रकार परिषदेसाठी आलेले मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना नोकरी विक्री प्रकरणात पोलिसांनी राजकारण्यांना दिलेल्या क्लीन चिटविषयी विचारले असता मुख्यमंत्र्यांनी कुणालाच क्लीन चिट देण्यात आली नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आपण पोलिस महासंचालकांशी या मुद्द्यावर बोललो आहे. त्यांनी 'क्लीन चिट' हा शब्द उच्चारलाच नसल्याचे सांगितले.
आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती डीजीपी व इतर अधिकाऱ्यांनी दिली आहे. क्लीन चिटची माहिती कोठून आली हे पोलिसांनाही ठाऊक नाही. कारण, पोलिसांनी कुणालाही निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिलेले नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा पोलिसांचे प्रवक्ते म्हणून स्वतःचा दर्जा घसरवून डीजीपींना "क्लीन चीट' दिली आहे. आता दिशाभूल करणारे डावपेच चालणार नाहीत. "कॅश फॉर जॉब" प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली उच्चस्तरीय चौकशी आयोगाची गोमंतकीयांची मागणी आहे. भाजपची आता सुटका नाही, असे काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर म्हणाले. नोकरीकांडावरून राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
पारदर्शी होणार तपास
या प्रकरणातील तपासात पोलिसांवर कोणतेच दडपण नाही. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तपास हा सखोल होणार आहे आणि पारदर्शी होणार आहे. त्यामुळे तपास एजन्सीबाबत किंवा तपासकामाबाबत अनाठायी संशय घेऊ नये, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
एसआयटी नाहीच
या प्रकरणात तपासासाठी एसआयटी नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. परंतु, हे प्रकरण एसआयटीकडे सोपविण्याचे सोडाच, क्राईम बँचकडेही सोपविण्याचे संकेत नाहीत. कारण तपास योग्य पद्धतीने चालल्याचे आणि योग्य गतीने चालल्याचे डीजीपींनीही म्हटले आहे आणि मुख्यमंत्र्यांनीही म्हटले आहे.
संदीप परबला न्यायालयीन, दीपश्रीला पुन्हा कोठडी
फोंडा : नोकरीकांड प्रकरणात लोकांची फसवणूक केलेल्या दीपश्री सावंत गावस हिला मध्यस्थ म्हणून काम केलेल्या सरकारी अभियंता संदीप परब याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दीपश्रीच्या सांगण्यावरून संदीप परब याने सुमारे ४४ लोकांकडून पावणेचार कोटी रुपये गोळा केले होते. प्रकरण अंगलट येत आहे ते त पाहून दि. ७ नोव्हेंबर रोजी त्याने म्हादोंळ पोलिस स्थानकात दीपश्रीच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून संपूर्ण माहिती घेतल्यानंतर फसवणूक प्रकरणात त्याचा थेट सहभाग असल्याचे लक्षात आल्यानंतर, ११ नोव्हेंबर रोजी त्याला अटक केली होती. त्या दिवसापासून तो पोलिस कोठडीत होता. कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयासमोर उभे केले असता सोमवारी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या दीपश्री महतो, गावस ऊर्फ सावंत हिला रविवारी म्हार्दोळ पोलिसांनी बदली वॉरंटवर अटक केली आहे. सोमवारी तिला न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने तिला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.