पणजी - जीवाचा गोवा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना येथे आल्यावर कोविड महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कोणतेही भान राहत नसल्याचे दिसून आले आहे. खास करून किनाऱ्यांवर घोळका करून दाटीवाटीने उभे राहणे, चेहऱ्यावर मास्क न बांधणे आदी प्रकार घडत आहेत. राज्यातील बार आता खुले झालेले आहेत. त्यामुळे बारमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर किंवा किनाऱ्यांवर मद्याच्या बाटल्या नेऊन खुलेआम दारूचे प्राशन केल्यानंतर तरुण पर्यटकांना कशाचेही भान राहत नाही. मार्गदर्शक तत्वांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.
केंद्राच्या आदेशावरून आंतरराज्य सीमा १ सप्टेंबरपासून खुल्या झालेल्या आहेत. कर्नाटक मधून कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची एसटी बससेवा तसेच गोव्याच्या कदंब महामंडळाने कर्नाटककडे बस सेवा सुरु केली आहे. त्यामुळे बेळगाव, हुबळी, धारवाड, बंगळुरू आदी भागातून तरुण पर्यटक येतात तसेच खासगी वाहनांमधूनही येतात. शेजारी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आदी भागातून तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणामधूनही पर्यटक गोव्यात येत असतात. हद्दी खुल्या झाल्यानंतर हॉटेलांचे आरक्षणही वाढलेले आहे. परंतु असे असले तरी हॉटेलांच्या भानगडीत हे तरुण पर्यटक पडत नाहीत. स्वतःचे वाहन घेऊन येणारे आणि किनाऱ्यावर बाहेरच रात्र काढून दुसऱ्या दिवशी परत जातात. गेल्या सहा महिन्यात लॉकडाउनमुळे गोव्यात येता आले नाही, त्यामुळे आता हद्दी खुल्या झाल्यावर पर्यटकांचा गोव्याकडे ओघ आहे. कळंगुट, बागा, मिरामार, हरमल, मांद्रे,मोरजी तसेच दक्षिण गोव्यातील बाणावली, माजोर्डा किनाऱ्यांवर सर्रास मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचे चित्र दिसत आहे.
हद्दी खुल्या केल्यानंतर येणाऱ्या पर्यटकांना कोविड चांचणीची गरज राहिलेली नाही. त्यामुळे तरुण मंडळी सहलीसाठी गोव्यात येऊ लागली आहे. गुजरात, दिल्ली किंवा दक्षिणेकडील पर्यटकांची संख्या तशी कमी आहे परंतु शेजारी राज्यांमधील पर्यटक दिसून येतात. रेंट ए बाईकने फिरताना तरुण वर्ग तसेच नवविवाहीत जोडपीही आता दिसू लागली आहेत. १ ऑक्टोबरपासून गोव्याचा पर्यटन हंगाम सुरू होत आहे. त्यानंतर ही संख्या आणखी वाढणार आहे.
स्थानिकांकडून संताप
कळंगुट तसेच बागा, कांदोळी आदी भागातील स्थानिकांनी पर्यटकांच्या या बेशिस्त वागण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पर्यटकांकडून स्थानिकांना कोविडची लागण होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
कळंगुट चे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी देशी पर्यटकांच्या बेशिस्त वागण्यावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, पोलीसही कोणतीच कारवाई करत नाहीत. मास्क न घातल्यास स्थानिक लोकांच्या पोलीस दंडुके घेऊन मागे लागतात, त्यांना दंड ठोठवतात. परंतु पर्यटकांच्या बाबतीत मात्र कोणतीच कारवाई करत नाहीत. पोलिसांनी कडक कारवाई करायला हवी.
दरम्यान, गोव्यात पर्यटन व्यवसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टूर अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले की, आंतरराज्य हद्दी खुल्या झाल्यानंतर हॉटेलांच्या खोल्यांचे आरक्षण १५ ते २० टक्क्यांवर पोचले आहे. हळूहळू पर्यटकांची संख्या वाढणार आहे. एकदा बाजारात कोविडविरोधी लस आली की, पर्यटकांचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहा म्हणाले की, पर्यटन व्यवसायाची गाडी रुळावर येण्यासाठी व्यावसायिकांना अजून बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर
जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग
"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही", आपचा भाजपावर हल्लाबोल
CoronaVirus News : "कोरोना व्हायरस नष्ट झाला", भाजपा नेत्याचा अजब दावा