पणजी : गोवा विधानसभा प्रकल्पात कुणाचाच आणखी पुतळा उभा करण्याच्या मागणीला भारतीय जनता पार्टी पाठिंबा देत नाही, असे पूर्णपणे स्पष्ट करणारा ठराव सोमवारी भाजपाच्या मंत्री, आमदार व प्रमुख पदाधिका-यांच्या बैठकीत मांडून संमत करण्यात आला. स्व. जॉक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभेच्या ठिकाणी उभारावा अशी मागणी करणा-या व भाजपसोबत सत्तेत असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाला हा धक्का असल्याचे राजकीय क्षेत्रत मानले जात आहे.ओपीनियन पोल दिनी गेल्या 16 रोजी मडगावमध्ये लोहिया मैदानावर झालेल्या गोवा फॉरवर्डच्या सभेवेळी मंत्री विजय सरदेसाई यांनी व अन्य नेत्यांनी सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभेत उभा करावा अशी मागणी करण्यात आली होती. भाजपचे आमदार मायकल लोबो यांनीही सिक्वेरा यांचा पुतळा उभा करावा व त्यासाठी आपण येत्या विधानसभा अधिवेशनात ठराव मांडण्यात येईल, असे म्हटले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपाची सोमवारी सायंकाळी पार्टी कार्यालयात बैठक झाली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, भाजपाचे सगळे मंत्री, आमदार, सभापती डॉ. प्रमोद सावंत तसेच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राजेंद्र आर्लेकर आणि अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी बैठकीत भाग घेतला.प्रत्येक मंत्री, आमदार व पदाधिका-याला भाजपाने भूमिका मांडण्यास सांगितले. फक्त लोबो व आमदार अॅलिना साल्ढाणा या दोघांनीच ज्ॉक सिक्वेरा यांचा पुतळा व्हायला हवा, कारण त्यांचे जनमत कौल चळवळीत मोठे योगदान आहे, असा मुद्दा मांडला. अन्य आजी-माजी आमदारांनी तसेच भाजप पार्टी संघटनेनेही आणखी पुतळयाची गरज नाही, अशी भूमिका बैठकीत मांडली. विजय सरदेसाई हे गेली पाच वर्षे विधानसभेत होते, तेव्हा त्यांनी कधीच स्व. ज्ॉक सिक्वेरा यांचे नाव घेतले नव्हते, मग आताच ते पुतळा का मागत आहेत असा प्रश्न पार्सेकर यांनी बैठकीत उपस्थित केल्याचे बैठकीला उपस्थित राहिलेल्या काहीजणांनी सांगितले. आपण व्यक्तीश: आणखी कुणाचाच पुतळा उभा करण्याच्याबाजूने नाही, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बैठकीत स्पष्ट केले. टॅक्सीवाल्यांचाही विषय बैठकीत चर्चेस आला तेव्हा आपण कुणालाच कोणतेच आश्वासन दिलेले नाही, असे सरकारतर्फे बैठकीत स्पष्ट केले गेले.
ठराव काय म्हणतो? मुक्तीनंतर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांना बहुजन समाजाचे निर्विवाद नेते (मसिहा) असे स्थान गोव्यात मिळाले. त्यांचा पुतळा विधानसभेसमोर उभा करण्यात आला. जनमत कौलानंतरही गोमंतकीयांनी आपले प्रेम व विश्वास स्व. बांदोडकर यांच्या नेतृत्वावर दाखवला व पुन्हा त्यांना मुख्यमंत्री केले, असे भाजपच्या ठरावात म्हटले आहे. बांदोडकरांप्रती लोकांची असलेली भावना दुखावली जाईल असे पक्ष काही करणार नाही, असेही ठरावात म्हटले आहे. तसेच जनमत कौलावेळी ज्या ज्या नेत्यांनी योगदान दिले व गोव्याला वेगळे राखले, त्या सर्वाप्रती आम्हाला आदर व मान आहे, अशीही भूमिका भाजपने ठरावातून मांडली आहे. जनमत कौलाचा इतिहास आणि गोवा मुक्ती चळवळीची माहिती विद्यालये व महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये मांडणो हे पाऊल योग्य दिशेने असून त्यामुळे नव्या पिढीला इतिहास कळेल, असेही ठरावात म्हटले आहे. यापुढे विधानसभेत अनेकांचा पुतळा उभा करण्याची मागणी येऊ शकते, भाजप अशा मागणीला पाठींबा देत नाही, असे ठरावात म्हटले आहे. सरचिटणीस तानावडे यांची ह्या ठरावावर सही आहे.
मी व्यक्तीश: आणखी पुतळे उभे करण्याच्या मताचा मुळीच नाही. कारण पुतळे सांभाळणो, त्यांची देखरेख करणो हे सगळे कठीण होऊन बसते. आमच्या पक्षाच्या ठरावात सर्व काही स्पष्ट आहे.- मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर .........
सिक्वेरा यांचा पुतळा व्हायला हवा ही माझी भूमिका आहे. बांदोडकर यांच्याप्रती मला खूप आदर आहे. विधानसभेत त्यांच्या बाजूला सिक्वेरा यांचा पुतळा उभा राहिल तेव्हाच बांदोडकरांच्या पुतळ्य़ाला पूर्णत्व येईल. मला भविष्यात जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा मी सिक्वेरा यांचा पुतळा उभा करीन.- आमदार मायकल लोबो......
भाजपाने घेतलेल्या ठरावामुळे मी नाराज झालो आहे पण लोकशाहीत प्रत्येक पक्षाला स्वत:ची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. गोवा फॉरवर्डने जी भूमिका घेतली आहे, ती भूमिका सर्व मंत्री, आमदारांना पटवून देण्याचा मी प्रयत्न करीन. स्व. सिक्वेरा यांचा पुतळा व्हायला हवा.- मंत्री विजय सरदेसाई