लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : पेडणे मतदारसंघातील जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. जनतेला हवे तेच यापुढे करणार आहे. धारगळ पंचायत क्षेत्रात पर्यायाने पेडणे मतदारसंघात होऊ घातलेले सनबर्न फेस्टिव्हल कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. प्रसंगी लोकांसमवेत रस्त्यावर उतरून फेस्टिव्हल उधळून लावू, असा इशारा पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा हस्तकला महामंडळाचे चेअरमन प्रवीण आर्लेकर यांनी दिला. मालपे येथे आपल्या कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी मोपाचे सरपंच सुबोध महाले, धारगळचे माजी सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक, पंच अनिकेत साळगावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, देवानंद गावडे, उद्योजक न्हानू हरमलकर आदी उपस्थित होते.
आमदार आर्लेकर म्हणाले, 'ज्यावेळी फेस्टिव्हल धारगळ पंचायत क्षेत्रात होणार असल्याचे समजले, तेव्हापासून अनेकांनी फोन करून, घरी येऊन संपर्क साधला. मी कधीही मतदारसंघात फेस्टिव्हल व्हावे यासाठी मागणी केलेली नाही. पर्यटनमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी याविषयी मला पूर्वकल्पना दिलेली नाही. मी लोकांबरोबर असेन. कारण लोकांनी मला आमदार केले आहे. लोकांना जे हवे तेच देण्याचा प्रयत्न करेन. प्रसंगी रस्त्यावर येऊन सनबर्न उधळून लावू,'
आमदार आर्लेकर म्हणाले, 'असे फेस्टिव्हल किनारपट्टीवर ठिक आहेत. पण, कळंगुट, हणजूण, वागातोर आणि थेट आता धारगळ असे करण्याचा सरकारचा काय हेतू आहे? सनबर्नसारखे फेस्टिव्हल आयोजित केले, तर गप्प राहणार नाही. फेस्टिव्हल हवा तर किनारी भागात घ्या. एखाद्यावेळी तो मांद्रे मतदारसंघात किनारपट्टीवर तो होऊ शकतो. परंतु माझ्या मतदारसंघात तो नको. पेडणेची संस्कृती वेगळी आहे. त्याचे जतन करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. माजी सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक यांनी सनबर्न फेस्टिव्हल आयोजित केले. पंचायतीने ना हरकत दाखला दिलेला नाही. किंवा कसल्याच प्रकारची कागदपत्रेही आलेली नाहीत. मग सरकारने थेट या फेस्टिव्हलला परवानगी दिली आहे का? आमदारांचा विरोध असेल तर पूर्णपणे धारगळ पंचायत मंडळाचा, पंचायत क्षेत्रातील नागरिकांचाही याला विरोध आहे.
माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, पेडणे तालुका नागरिक समितीचे भारत बागकर आदींनी फेस्टिव्हलला विरोध असल्याचे सांगितले.
सनबर्न नको, रवींद्र भवन उभे करा
मोपाचे सरपंच सुबोध महाले म्हणाले, गोमंतकाची संस्कृती वेगळी आहे. पेडणे तालुका ही कलाकारांची खाण आहे. भविष्यात पेडणे तालुक्यात रवींद्र भवनाचा प्रकल्प उभा राहणार आहे. अशावेळी सनबर्नसारखे फेस्टिव्हल होऊ घातले तर रवींद्र भवानासारखे प्रकल्प ओस पडतील
फेस्टिव्हल पेक्षा रोजगार द्या
धारगळचे माजी सरपंच तथा पंच अनिकेत साळगावकर यांनी सरकारने पेडणे तालुक्यात होऊ घातलेले जे प्रकल्प अर्धवट प्रकल्प आहेत, ते पूर्ण करावेत. आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा. मोपा विमानतळावर सोयी सुविधा द्याव्यात. टॅक्सी व्यावसायिकांचा प्रश्न सोडवावा. सनबर्नसारख्या फेस्टिव्हलमधून नागरिकांना चुकीचा मार्ग सरकारने दाखवू नये.