वासुदेव पागी ल्ल पणजी परीक्षा म्हटली की, तणाव येतोच. पालकांच्या अपेक्षा, शिक्षकांची आग्रही भूमिका आणि गुणांचे लक्ष्य गाठण्याची अदृश्य भीती परीक्षेच्या वेळी एकत्रित होते आणि विद्यार्थी दबावाखाली येतात. मात्र, आता ही स्थिती बदलण्याचा निर्धार गोवा शालान्त मंडळाने केला आहे. मानसिक तणाव आणि घोकमपट्टीला फाटा देणाऱ्या सुलभ प्रश्नपत्रिका काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून नववीच्या प्रश्नपत्रिका या पद्धतीने काढण्यात येणार आहेत. परीक्षा सोपी करणे याचा अर्थ परीक्षेचा दर्जा कमी करणे, असा होत नाही. परीक्षेचा दर्जा राखून किंबहुना तो वाढवून या प्रश्नपत्रिकेत बदल करण्यात येणार आहेत, असे शालान्त मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ताणवविरहित परीक्षेचा विषय सध्या प्रस्ताव स्वरूपात असला, तरी तो मंडळाच्या विचाराधीन आहे. येत्या शैक्षणिक वर्षांत त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल. सुरुवातीला नववीच्या वर्गासाठी त्याची अंमलबजावणी होणार आहे आणि नंतर नववीची तुकडी दहावीत गेल्यानंतर दहावी इयत्तेतही ती चालू राहणार आहे. म्हणजेच संपूर्ण माध्यमिक शिक्षण हे ताणरहीत बनविण्यात येणार आहे. शालान्त मंडळाने मागील दोन वर्षांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची यशस्वी अंमलबजावणीही करून दाखविली आहे. त्यात परीक्षेचे अर्ज आॅनलाईन सादर करणे, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष हॉल तिकीट बनविणे, कागदोपत्री निकाल छापणे बंद करणे. कठीण विषयांची सक्ती काढून त्या जागी सोप्या विषयांची सक्ती करणे आणि इतर निर्णयांचा समावेश आहे. मंडळाचे काही प्रस्ताव सरकारने मंजुरी न दिल्यामुळे अडून आहेत.
नो टेन्शन! माध्यमिक परीक्षा होणार सुलभ
By admin | Published: February 20, 2015 1:25 AM