पणजी : मंत्र्यांना अतिरिक्त खाती देऊन मंत्र्यांमधील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे शुक्रवार (12 ऑक्टोबर)व शनिवारी(13 ऑक्टोबर) दिल्लीतील एम्स इस्पितळात होणा-या बैठकीत करतील. विधानसभा विसर्जन सध्या कुणालाच नको आहे. विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका भाजपालाही नको आहेत. लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभेच्या निवडणुका होऊ नयेत, याची काळजी राज्यातील तिन्ही खासदार घेत असल्याची माहिती मिळते.
गोव्यात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होऊ शकतात, अशी चर्चा काँग्रेसमध्ये पसरलेली आहे. प्रत्यक्षात मुख्यमंत्री पर्रीकर यांना किंवा भाजपालाही विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका झालेल्या नको आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाला तर सध्या निवडणुका कोणत्याच स्थितीत झालेल्या नको आहेत. त्यामुळे भाजपाचे काही निर्णय पसंत पडले नाहीत तरी फॉरवर्डचे नेते असलेले मंत्री विजय सरदेसाई यांना कळ सोसावी लागत आहे. अतिरिक्त खात्यांच्या वाटपानंतर सर्व मंत्र्यांमध्ये असलेली नाराजी दूर होईल काय किंवा त्यांच्यामध्ये कामाचा उत्साह वाढेल काय या प्रश्नाचे उत्तर पुढील काही दिवसांतच मिळेल. तूर्त मंत्री सरदेसाई व भाजपचे मंत्री विश्वजित राणो यांच्यातील संबंध खूप सुधारले आहेत. दोन्ही नेते जवळ आले आहेत. मात्र मंत्री सरदेसाई व मगोपचे नेते असलेले मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यात स्नेह राहिलेला नाही. फॉरवर्ड व मगोप हे दोन्हीही पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचे प्रमुख घटक पक्ष आहेत.
खाते वाटपाच्या प्रक्रियेत किंवा मंत्र्यांना अधिक अधिकार देण्याच्या प्रक्रियेत मंत्री ढवळीकर व मंत्री सरदेसाई हे दोघेही दुखावले जाणार नाहीत याची काळजी मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल अशी चर्चा भाजपामध्ये आहे. त्याचबरोबर भाजपच्या मंत्र्यांना एकमद कमी महत्त्वाची खाती मिळाली असेही होऊ नये असे भाजपा पक्ष संघटनेतील काही पदाधिका-यांना वाटते. विधानसभेच्या निवडणुका दीड वर्षापूर्वीच झालेल्या आहेत. आता लोक सर्वावरच नाराज असताना पुन्हा निवडणुकीला जाऊया नको असे बहुतेक मंत्र्यांना वाटते पण प्रसंगी निवडणुका चालतील पण आम्ही सुदिन ढवळीकरांवर अन्याय झाला तर तो सहन करून घेणार नाही, कारण ढवळीकर हे मंत्रिमंडळात ज्येष्ठ आहेत, असे मगोपचे पदाधिकारी म्हणतात. प्रत्यक्षात मध्यावधी निवडणुका झाल्या तर मगोपला देखील मोठा लाभ होण्याची शक्यता नाही. मात्र खात्यांचा विषय हा प्रतिष्ठेचा बनला आहे. पर्रीकर खाते वाटपाची श क्रिया कशा प्रकारे करतात ते पहावे लागेल.