काशिराम म्हांबरे
म्हापसा- आयोजनाच्या आरंभी स्तरापासून सतत विरोध झालेल्या सनबर्न या संगीत महोत्सवा विरोधात हणजूण पोलीस स्थानकावर आता तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत. वागातोर परिसरात आयोजित होणाºया या महोत्सवा विरोधात स्थानीकांनी एकत्रीत येऊन होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर तक्रार दाखल केली आहे. तर महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्यांनी मागील दोन दिवसात मोबाईल चोरीच्या शेकडो तक्रारी हणजूण पोलीस स्थानकावर दाखल केल्या आहेत. केलेल्या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांनी ६ जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेले काही मोबाईल फोनही ताब्यात घेण्यात आले आहेत.
आरंभी पासून सतत चर्चेत राहिलेला सनबर्न आता सुरु असतानाही चर्चेत कायम राहिला आहे. शुक्रवार २८ डिसेंबर पासून सुरु झालेल्या या महोत्सवाचा आज ३० डिसेंबर रोजी शेवटचा दिवस आहे. सनबर्नात सुरु असलेल्या संगीतामुळे परिसरात ध्वनी प्रदूषण होत असल्याने त्यातून त्रास होऊ लागल्याच्या तक्रारी वागातोर परिसरातील नागरिकांनी एकत्रीत येऊन हणजूण पोलीस स्थानकावर केल्या आहेत. यात जेष्ठ नागरिकांचा जास्त प्रमाणावर समावेश होता. महोत्सवात पहाटेपर्यंत संगीत वाजवले जात असून त्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानीकांनी पोलिसांकडे केली आहे. ज्या भागात सनबर्न आयोजित करण्यात आला आहे तो रहिवासी भाग असल्याची माहिती देण्यात आली.
तक्रारीची दखल कुठल्याच यंत्रणेकडून घेतली जात नसल्याच्या कारणास्तव नाराजी व्यक्त केली आहे. स्थानीक पंचायत तसेच पोलिसही तक्रारीवर दुर्लक्ष करीत असल्याची माहिती देण्यात आली. व्यवसायावरही सनर्बनचे परिणाम होत असल्याचाही दावा त्यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.
दरम्यान गेल्या दोन दिवसात मोबाईल चोरीच्या शेकडो तक्रारी हणजूण पोलीस स्थानकावर दाखल झाल्या आहेत. करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांनी सनबर्न परिसरात कार्यरत असलेली ६ जणांची टोळी ताब्यात घेतली आहे. त्यांच्याकडून चोरलेले काही मोबाईल फोनही हस्तगत करण्यात आले आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ६०० पासांची चोरी झाल्याची तक्रार महोत्सवाच्या व्यवस्थापनाकडून दाखल करण्यात आलेली. त्यानंतर तेथेकाम करणाºया ५ कर्मचाºयांना अटक करण्यात आले होते.