पणजी: गोमेकॉत नवीन व्यवस्था लागू करण्यात आल्यापासून बिगर गोमंतकीय रुग्णांची संख्या काही अंशी कमी झाल्याचे एक महिन्याच्या काळात आढळून आले असले तरी एक दोन महिन्यात ही तूट लवकरच भरून येणार असल्याचा गोमेकॉ प्रशासनाचा दावा आहे. केवळ गैरसमजांमुळेच बिगर गोमंतकियांची संख्या काही अंशी कमी झाली असल्याचाही गोमेकॉचा दावा आहे. गोमेकॉच्या ओपीडीत ३० दिवसात साधारणपणे ३८ ते ४० हजार रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यात २५ ते ३० टक्के हे बिगर गोमंतकीय तर ७० ते ७५ टक्के रुग्ण हे गोमंतकीय असतात. नवीन रचनेनंतर ही टक्केवारी काही प्रमाणात खाली आली आहे. जानेवारी महिन्यात जवळ ३० हजाराहून अधिक तर बिगर गोमंतकियांची संख्या ९ हजारांच्या घरात होती. अनुक्रमे ७७ टक्के व २३ टक्के असे हे प्रमाण होते. बिगर गोमंतकीय रुग्णांच्या प्रमाणात ५ ते ६ टक्के घट झाल्याचेही संकेत मिळत होते. ही अल्प प्रमाणात आढळून आलेली घट ही संभ्रमामुळे किंवा लोकांना अपुरी माहिती गेल्यामुळे झाल्याचे गोमेकॉचे अधीक्षक डॉ शिवानंद बांदेकर यांचे म्हणणे आहे. गौमकॉत बिगर गोमंतकिय रुग्णांकडून उपचारांसाठी पैसे घेतात अशा प्रकारची माहिती बाहेर गेल्यामुळेही तसे होण्याची शक्यता असते. प्रत्यक्षात त्यांच्याकडून घेतले जाणारे शुल्क हे अत्यंत माफक आहे. दरम्यान बिगर गोमंतकियांसाठी शुल्क लागू झाले असले तरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत बिगर गोमंतकीय रुग्णांना शुल्कात सवलत दिली जात आहे. आतापर्यंत ३० हून अधिक बिगर गोमंतकियांना शुल्क माफ करून उपचार करण्यात आले असल्याची माहिती गोमेकॉकडून देण्यात आली. संबंधित विभागाच्या डॉक्टरकडून तशी शिफारस त्यासाठी हवी असते आणि सवलतीसाठी नियुक्त समितीची मंजुरी हवी असते. या पद्धतीत अधिक सुधारणा हव्या असल्यास त्याही केल्या जातील. या प्रकरणात लोकांकडून दिल्या जाणाºया सूचनांचेही स्वागत केले जाणार असल्याचे डॉ बांदेकर यांनी सांगितले.
‘बिगर गोमंतकीय गोमेकॉला पाठ फिरवणार नाहीत’ -गोमेकॉचा प्रशासनाला विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 8:17 PM