लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : उत्तर गोव्यातून सलग सहाव्यांदा लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले श्रीपाद नाईक यांनी सोमवारी संस्कृत भाषेतून तर दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी कोकणीतून खासदारकीची शपथ घेतली. दिल्ली येथे संसद भवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोव्यातून सलग सहाव्यांदा खासदार म्हणून भाजपच्या तिकिटावर निवडून येत इतिहास रचला आहे.
त्यांची केंद्र सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यांच्याकडे ऊर्जा राज्यमंत्री पदाचा ताबा आहे. यापूर्वी त्यांनी दोन वेळा केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद भूषवले होते. केंद्रात सलग तिसऱ्यांदा मंत्री बनून गोव्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे.
दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी कोकणी या आपल्या मातृभाषेतून खासदारकीची शपथ घेतली. यावेळी त्यांनी कुणबी शाल परिधान केली होती. कॅप्टन विरियातो हे पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपच्या पल्लवी धेपे यांचा १३ हजार ५३५ मतांनी पराभव करून काँग्रेसची दक्षिण गोव्याची जागा राखली.
दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर दोन्ही खासदारांचे अभिनंदन होते आहे. यापूर्वी सदानंद तानावडे यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली होती. त्यांनी ही शपथ मराठीतून घेतल्याने त्यांचे राज्यभर कौतुक झाले होते.