पणजी: उत्तर गोव्याला २०२४ अखेर पर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. पाणी पुरवठा सुरुळीत व्हावा या हेतूने सरकारने ३५० एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्पावर सुमारे २५० कोटी रुपये खर्च केले असल्याचे जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिराेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान तिळारी धरणांच्या कालव्याचे दरवाजे खुले झाल्याने तेथून सोडलेले पाणी अखेर गुरुवारी सकाळी पर्वरी येथील जलशुध्दीकरण प्रकल्पात पोहचले आहे. त्यामुळे पर्वरी व साळगाव परिसराला आता पाणी पुरवठा सुरुळीत होईल. कालव्यांचे दरवाजे लॉक झाल्याने पर्वरी येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाला पाणी पुरवठा बुधवारी होऊ शकला नव्हता. त्यानंतर पुण्याहून आलेल्या तज्ञांच्या पथकाने हे दरवाजे खुले केले असे त्यांनी सांगितले.
शिरोडकर म्हणाले, की गोव्यात विशेष करुन उत्तर गोव्यात २०२४ अखेर पर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. पाणी पुरवठा सुरुळीत करण्यासाठी सरकारने ३५० एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्पावर सुमारे २५० कोटी रुपये खर्च केले आहेत.याशिवाय पिळर्ण, पर्वरी येथील जलशुध्दीकरण प्रकल्पांचे कामही लवकरच पूर्ण होईल असेही शिरोडकर यांनी सांगितले.