- वासुदेव पागीपणजी : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय संचलित राष्ट्रीय ओपन स्कूलच्या (एनओएस) दहावीच्या निकालात मोठा घोळ आढळून आला आहे. गोव्यातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 38 जणांना गुणपत्रिकेवर गैरहजर दाखविण्यात आल्यामुळे विद्यार्थी व पालक संतप्त झाले आहेत. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाद्वारे संचालित करण्यात येणा-या राष्ट्रीय मुक्त विद्यालयातून मोठ्या प्रमाणावर गोव्यातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गोव्यात या विद्यालयाची अनेक अभ्यासकेंद्रे आहेत आणि तीन परीक्षा केंद्रे आहेत. यापैकी कुडचीरे येथील अभ्यास केंद्रात २५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. एप्रिलमध्ये झालेल्या या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाला होता. परंतु त्यात या केंद्रावरील ३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीच नसल्याचे त्यांच्या गुणपत्रिकेत म्हटले आहे. काही विद्यार्थ्यांना दोन विषयात गैरहजर तर काहींना तीन विषयातही गैरहजर म्हणून शेरा देण्यात आला आहे.
या प्रकारामुळे कुडचिरे विद्यार्थी व पालकही संतापले आहेत. कुडचिरे येथील हेडमास्तर असलेले श्रीकृष्ण नाईक यांना याविषयी विचारले असता त्यांनी गैरहजर म्हणून दाखविण्यात आलेले विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती असे सांगितले. शिवाय तेथील नोंदवहीतही त्या विद्यार्थ्यांची नावे व स्वाक्षरी आहेत. हा विषय पुणे येथील विभागीय कार्यालयात पाठविण्यात आला असून तातडीने हालचाली करून समस्या सोडविण्याची विनंती करण्यात आल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पुण्याहून नंतर दुरुस्तीचे निकालपत्रही आले आहे. त्यात विनाकारण गैरहजर म्हणून नोंदले गेलेल्या ३८ पैकी १७ विद्यार्थ्यांचा निकाल दुरुस्त करून पाठविण्यात आला आहे. त्यातही पुन्हा आणखी त्रुटी राहिल्या आहेत. जे तीन विषयात गैरहजर दाखविण्यात आले होते ते दुरुस्तीच्या गुणपत्रकात १ विषयात नापास म्हणून दाखविण्याचेही प्रकार घडले आहेत. म्हणजेच दुरुस्तीचा निकालही पुन्हा सदोष पाठवण्यात आला आहे. या विषयी विभागीय सहसंचालक अशोक कुमार आणि एनआयओएस च्या गोवा विभागाचे प्रमुख सुनिल माने यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उठविला नाही.