लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : पेडणे अबकारी कार्यालयातील घोटाळ्याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. गरज पडल्यास हे प्रकरण 'एसीबी'कडे सोपविण्यात येईल. मात्र, यातील एकाही दोषीला सोडले जाणार नसून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विशेष पोलिस स्थानकाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर, मोपा सरपंच सुबोध महाले, वारखंड सरपंच गौरी जोसालकर, पेडणे भाजप मंडळ तुलसीदास गावस, पेडणे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग, माजी नगराध्यक्ष उषा नागवेकर, नगरसेविका आश्विनी पालयेकर, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, नगरसेविका विशाखा गडेकर, सूर्यकांत तोरस्कर, रमेश सावळ देसाई, सरपंच सुजाता ठाकूर, पंच स्वाती मालपेकर उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वी मोपा विमानतळ सुरू झाला; परंतु येथील पोलिस ठाणे एका शेडमध्ये होते. तेथील पोलिस कर्मचाऱ्यांना त्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. आता नव्याने सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीत वाहतूक पोलिसांसह इतर पोलिस विभागासाठी सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पेडणे तालुक्यात बस आणि रेल्वेसेवा उपलब्ध होती. आता विमानसेवा सुरू झाली आहे. भविष्यात या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानसेवाही सुरू होणार आहे. मोपा विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक तैनात करण्याबरोबरच गृहखाते कार्यक्षम बनविले जात आहे. त्यासाठी योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
संधीचं सोनं करा
मोपा विमानतळामुळे पेडणे तालुक्याची मोठ्या प्रमाणात प्रगती होणार आहे. येणाऱ्या काळात मोपावरून हजारो रोजगार, व्यवसाय यांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील युवकांनी स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे.. कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमाचे धडे घ्या आणि स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
पोलिस आऊटपोस्ट हवे: प्रवीण आर्लेकर
आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोपा विमानतळासाठी एक भव्य असे पोलिस स्टेशन दिलेले आहे. परंतु, या परिसरातील नागरिकांना या स्टेशनवर येताना अडचणी येणार आहेत. त्यासाठी एखादे आउटपोस्ट विमानतळाच्या पलीकडे उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
दोन्ही आमदारांनी 'भिवपाची गरज ना'
पेडणे तालुक्याच्या विकास करण्यास सरकार कटिबद्ध आहे. मी स्वतः येथील विकास प्रकल्पांवर लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासात कोणत्याही अडचणी येणार नसून दोन्ही आमदारांना भिवपाची गरज ना, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.