पणजी - गेल्या 7 जानेवारी रोजी सरकारने लेखाधिका-यांच्या (अकाऊटंट्स) 80 पदांसाठी सुमारे 8 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली होती पण त्या परीक्षेचे सगळे उमेदवार नापास झाले. एकही उमेदवार पात्र ठरला नाही, असे लेखा खात्याच्या संचालकांनी अधिसूचनेद्वारे मंगळवारी येथे जाहीर केले आहे. परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सात महिन्यांचा कालावधी का लागला ते मात्र स्पष्ट झालेले नाही.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लेखाधिका-यांच्या 80 पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. 10 हजार 712 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. पात्र उमेदवारांसाठी गेल्या दि. 7 जानेवारीला परीक्षा झाली होती. सुमारे आठ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती. प्रश्नपत्रिका खूप कठीण होती अशा प्रकारच्या तक्रारी त्यावेळी केल्या गेल्या होत्या. सरकार कदाचित आता लेखाधिकारी पदासाठी नव्याने जाहिरात करताना 80 ऐवजी कमी पदांसाठी जाहिरात करील अशी चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. 8क् पदांमध्ये 43 पदे सर्वसामान्य गटासाठी, 21 पदे इतर मागासवर्गीय, 9 अनुसूचित जमातींसाठी, 2 अनुसूचित जाती तसेच दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकांची मुले व माजी सैनिकांसाठी प्रत्येकी एक पद होते. एकही उमेदवार पात्र ठरला नाही असे जाहीर केले गेले तरी, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास लागलेला विलंब ही चर्चेची गोष्ट ठरली आहे. मुख्यमंत्री अमेरिकेत असताना आता निकाल जाहीर केला गेला. सरकारने अन्य काही खात्यांमध्येही भरतीसाठी अलिकडे उमेदवारांच्या लेखी परीक्षा घेतल्या आहेत. त्या लेखी परीक्षांचा निकाल जाहीर करतानाही विलंब लावला जाऊ शकतो. लेखाधिकारी पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल कसा लागतो हे जाणून घेण्याची उत्सुकता काही मंत्री व आमदारांमध्येही होती. शिवाय हजारो उमेदवारांचेही त्याकडे लक्ष होते. लेखा खात्याने आपली अधिसूचना खात्याच्या सूचना फलकावर लावली आहे.