पणजी : राज्यातील खनिज खाण बंदीचा विषय व मांडवी नदीतील कॅसिनो जहाजांचा विषय विरोधी काँग्रेस पक्षाने अलिकडे लावून धरला आहे. त्यानंतर आता भाजपाप्रणीत आघाडी सरकारचा घटक असलेला गोवा फॉरवर्ड पक्षही हे दोन्ही विषय हाती घेणार आहेत. आपण सत्तेत असलो तरी, विरोधी पक्षांसाठीचा सगळा अवकाश काँग्रेसला व्यापू द्यायचा नाही, असे गोवा फॉरवर्डच्या बैठकीत ठरले असून या निर्णयाची अंमलबजावणी आज बुधवारपासूनच सुरू होत आहे.
लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. गोव्यातील सांगे, केपे, डिचोली, फोंडा, धारबांदोडा व सत्तरी या सहा तालुक्यांमधील खनिज खाणी बंद असल्याने त्या भागातील मतदार अस्वस्थ आहेत. अशावेळी विरोधी काँग्रेस पक्ष खनिज खाणींचा विषय वारंवार मांडत आहे. आपणही याविषयी स्वस्थ न बसता खनिज खाणींचा विषय हाती घ्यावा असे गोवा फॉरवर्डने ठरवले आहे. खनिज खाणी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश जारी करणो हाच प्रभावी व लवकर अंमलात येऊ शकेल असा मार्ग असल्याची भूमिका यापूर्वी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व मंत्री विजय सरदेसाई यांनी मांडली होती पण मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या डोक्यात काही तरी वेगळेच आहे. त्यांनी अजून खाणप्रश्नी पंतप्रधानांची भेट घेतलेली नाही. ते पंतप्रधानांना भेटून आल्यानंतरच खनिजखाणप्रश्नी स्पष्टता येईल. तथापि, खाणप्रश्न आणखी झुलवत न ठेवता तो लवकर सोडविला जावा म्हणून केंद्र व गोवा सरकारवर अप्रत्यक्षरित्या दबाव टाकण्याचे काम गोवा फॉरवर्ड करील, असे सुत्रंनी सांगितले.
विरोधी काँग्रेसने सातत्याने मांडवी नदीतील कॅसिनोंविरुद्धही आवाज उठवला आहे. गिरीश चोडणकर हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर या आवाजाला धार चढली. यापूर्वी विरोधात असताना भाजपही कॅसिनोंविरुद्ध आवाज उठवित आला. गेली पाच वर्षे भाजप सरकारकडून कॅसिनोप्रश्नी धोरण आणण्याची तसेच गेमिंग आयुक्त नेमण्याची फक्त घोषणाच केली जात आहे. प्रत्यक्षात कॅसिनो धोरण आणलेच जात नाही. कॅसिनो धोरण लवकर आणले जावे अशी मागणी गोवा फॉरवर्ड आता करणार आहे.
गोवा फॉरवर्डच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी रात्री झाली. काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांमध्ये आपण कामाची व्याप्ती वाढवावी व कॅसिनो, खनिज खाणी अशा विषयांवरून आपणही थोडे आक्रमक बनावे असे फॉरवर्डमध्ये तत्त्वत: ठरल्याचे सुत्रंनी स्पष्ट केले.